संजीव कुळकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारमध्ये नांदेड जिल्ह्यातील भाजपच्या चार आमदारांतून एखाद्याला सामावून घेतले जाणार का, ते पुढील आठवड्यात स्पष्ट होईल. त्याचवेळी शिंदे समर्थक माजी आमदार सुभाष साबणे यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लावली जाईल, अशी चर्चा सुरू आहे. मात्र ते सध्या विधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. मात्र ते सध्या मुंबईत तळ ठोकून तर आहेतच, शिवाय त्यांच्यासाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकरही प्रयत्न करत आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात काही धक्कादायक बाबींची नोंद झाली. भाजपने सेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून सर्वांना चकित केले. आता नव्या सरकारमध्ये या गटाला १८ मंत्रिपदे दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

भाजप-शिवसेना युतीच्या मागील राजवटीत या दोन्ही पक्षांनी नांदेड जिल्ह्याला प्रतिनिधित्व दिले नव्हते. आता भाजप आणि शिंदे गट आमदारांचे जिल्ह्यातील संख्याबळ पाच असून त्यातून एखाद्याला संधी मिळेल असा दावा त्यांचे समर्थक करू लागले आहेत.

साबणे यांनी शिवसेनेतर्फे तीन वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले. २०१९ साली त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर देगलूर मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याचा प्रसंग आला तेव्हा साबणे यांनी भाजपात प्रवेश करून नशीब आजमावले होते. या नव्या प्रयोगात त्यांना एकनाथ शिंदे यांचे पाठबळ मिळाले; पण त्यांचा पुन्हा पराभव झाला. आता ते तांत्रिकदृष्ट्या भाजपचे असले, तरी नवे मुख्यमंत्री शिंदे यांचे सर्वांत जवळचे असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शिंदे गटाच्या कोट्यातून त्यांना राज्यमंत्री केले जाऊ शकते. भाजपच्या एका आमदारानेच ही शक्यता बोलून दाखविली.

एकनाथ शिंदे यांच्या धाडसी राजकीय बंडात जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार बालाजी कल्याणकर हे पहिल्याच दिवशी सहभागी झाले. तथापि जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि बहुसंख्य शिवसैनिक पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासोबत असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिवसेनेत फूट पाडण्यासाठी शिंदे गटाचे प्रतिनिधी म्हणून साबणे यांना बळ दिले जावे, असे सांगण्यात येत आहे.

नवे सरकार येण्याचे नक्की झाल्यावर जिल्ह्यातील भाजपचे चारही आमदार मुंबईमध्ये असून त्यांच्यातील डॉ. तुषार राठोड आणि राजेश पवार यांनी ‘लाल दिव्या’साठी प्रयत्न चालवले आहेत. विधान परिषद सदस्य राम पाटील रातोळीकर यांचीही राज्यमंत्री होण्याची इच्छा आहे. किनवटचे भीमराव केराम हे भाजपचे आमदार असले तरी त्यांचे नाव चर्चेत वा शर्यतीत नाही, असे भाजपमधील कार्यकर्ते सांगत आहेत.

खासदार चिखलीकरही तीन-चार दिवस मुंबईमध्ये होते. देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी किमान तीन वेळा भेट घेतली. एका भेटीत त्यांच्यासोबत सुभाष साबणे हेही फडणवीस यांच्या बंगल्यावर होते. भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्री करून साबणे यांच्यासारख्या त्यांच्या कट्टर समर्थकाच्या राजकीय पुनर्वसनाची सोय केली आहे. जिल्ह्यातील डॉ. राठोड, राजेश पवार किंवा रातोळीकर यांच्यापैकी कोणी राज्यमंत्री झाले, तर ते त्यांच्या पद्धतीने कारभार करतील, ही बाब लक्षात घेता चिखलीकर यांना सुभाष साबणे हे अधिक सोयीचे वाटतात. जिल्ह्यातील शिवसेना चिखलीकरांनी पाच वर्षांपूर्वी कमकुवत केली. आता ती आणखी कमकुवत करायची असेल, तर साबणेंचे राजकीय पुनर्वसन करावे असा पर्याय मुख्यमंत्री एकनाथ शिंदें स्वीकारतील काय, याबाबतची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhash sabane from nanded trying to get minister post in shinde governmentprint politics news asj
First published on: 03-07-2022 at 09:26 IST