Top Five Political News in Today : आज दिवसभरात मुंबईपासून ते राजधानी दिल्लीपर्यंत अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. सर्वोच्च न्यायालयाने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक २०२५ मधील दोन महत्त्वाच्या तरतुदींना स्थगिती दिली. नाशिकमध्ये शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देवाभाऊ उल्लेख करीत त्यांना एक सल्ला दिला, तर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपा नेते तथा मंत्री गिरीष महाजनांच्या विधानाचा समाचार घेतला. भारत-पाकिस्तान यांच्यातील दुबई येथे झालेला सामना फिक्स होता. या सामन्यादरम्यान १.५ लाख कोटी रुपयांचा जुगार खेळला गेला, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला, तर मी शिवभक्त असून सारे विष गिळून टाकतो, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना लगावला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
वक्फ कायद्यातील तरतुदींना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक २०२५ मधील दोन महत्त्वाच्या तरतुदींना आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. मात्र, यावेळी संपूर्ण कायदा स्थगित करता येणार नाही असं स्पष्ट करीत न्यायालयाने त्यासंदर्भातील याचिका फेटाळून लावली. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक पूर्णपणे रद्द केलं जावं, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने स्थगित केलेल्या तरतुदींमध्ये वक्फ बोर्डामध्ये मुस्लीम सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भातील तरतूद आणि जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित जमीन वक्फची आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार या दोन तरतुदींचा समावेश आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने (AIMPLB) समाधान व्यक्त केलं आहे. “या कायद्याच्या कलम ३ व कलम ४ वर स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश एक स्वागतार्ह आहे. याप्रकरणाचा अंतिम निकाल आल्यानंतर मुस्लीम समुदायाला मोठा दिलासा मिळेल”, असं ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य खालिद रशीद फरंगी महली यांनी म्हटलं आहे.
फडणवीसांचा देवाभाऊ उल्लेख करीत शरद पवारांचा सल्ला
नाशिकमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देवाभाऊ असा उल्लेख करीत त्यांना एक सल्ला दिला. “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात दुष्काळ पडला होता, त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सोन्याची नाणी दिली होती. आज शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारणार करत असलेले बळीराजाकडे ढुंकूनही पाहत नाही. आपल्याला बघ्याची भूमिका घेता येणार नाही. आगामी ठराविक दिवसांत मदत केली नाही तर नाशिकचा हा मोर्चा भविष्यात आणखी उग्र रूप घेईल,” असा इशारा शरद पवार यांनी दिला. “देवाभाऊ देशाच्या आजूबाजूला बघा काय घडत आहे. नेपाळमध्ये काय घडत आहे, ते पाहा. तेथील राज्यकर्ते गेले आणि त्या ठिकाणी एक भगिनी आली आणि तिच्या हातात तेथील सत्ता देण्यात आली. त्यावरून देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी शहाणपणाची भूमिका घेतील,” असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिला.
आणखी वाचा : Narendra Modi Biography : पंतप्रधान मोदींना आई हिराबेन यांच्याकडून कशी प्रेरणा मिळाली?
खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री गिरीष महाजनांना सुनावलं
विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी कोणी कसाही असला तरी त्याला भाजपामध्ये घ्या, असा सल्ला देणारे मंत्री गिरीष महाजन यांना राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनावलं आहे. देशात लोकशाही असून दडपशाही नाही. देश कोणाच्या मर्जीने चालत नसून संविधानानेच चालतो. सगळेच ईडी, सीबीआयला घाबरत नाही, असा टोला खासदार सुळे यांनी मंत्री महाजनांना लगावला, त्या नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होत्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत बहुमत मिळवण्यासाठी कोणी कसाही असला तरी त्याला भाजपामध्ये घेऊन विरोधकांचे तोंड एकदाचे बंद करा, असा सल्ला मंत्री महाजन यांनी भाजपाच्या जळगाव पूर्वच्या कार्यशाळेत दिला होता. जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस यांना मिळणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी केली होती, त्यावरून सुळे यांनी महाजनांचा समाचार घेतला आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील दुबईतला सामना फिक्स होता, संजय राऊतांचा दावा
भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी दुबई येथे खेळवण्यात आलेला सामना फिक्स होता. या सामन्यादरम्यान १.५ लाख कोटी रुपयांचा जुगार खेळला गेला, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केला. “केंद्र सरकारने हा सामना खेळवून पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं आहे. रविवारी खेळवण्यात आलेल्या या सामन्यात १.५ लाख कोटी रुपयांचा जुगार खेळला गेला आहे. कदाचित त्यातले काही पैसे पाकिस्तानला देखील मिळाले असतील,” असं राऊत म्हणाले. “आमच्या देशातील २५ महिलांचं कुंकू पुसून तुम्ही क्रिकेट खेळत बसलेले आहात. तुम्हाला लाजा वाटत नाहीत का? ज्यांनी आमच्या महिलांचं कुंकू पुसलं त्यांच्याबरोबर क्रिकेट कसलं खेळताय?” अशी टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली.
हेही वाचा : Manipur Violence : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर मणिपूरमध्ये पुन्हा हिंसक निदर्शने; काय आहे कारण?
मी शिवभक्त, विषही गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी दरांग आणि गालाघाट येथील नुमालीगडमध्ये १८ हजार ५०० कोटींच्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी काँग्रेससह इंडिया आघाडीच्या नेत्यांवर शाब्दिक हल्ला चढवला. “माझ्याविषयी कितीही अपमानास्पद बोला, मी शिवभक्त आहे. सारे विष गिळून टाकतो; परंतु इतर कुणाचा अपमान झाला तर मला सहन होत नाही,” असा इशारा पंतप्रधानांनी विरोधकांना दिला. काँग्रेसचे नेते भारतीय लष्कराला पाठिंबा देण्याऐवजी पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवाद्यांचे समर्थन करीत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. घुसखोरांना कोणत्याही परिस्थितीत जमीन लाटू देणार नाही. लोकसंख्येचा समतोल बदलण्याचा हा कट कधीही यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.