दक्षिणेकडील राजकारणावर चित्रपट क्षेत्राचा असलेला पगडा तमिळनाडूच्या पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चित्रपट अभिनेता आणि सुपरस्टार विजय यांच्या तमिळ वेटरी कझगम (टीव्हीके) या पक्षाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे कायम राहणार का, याकडे दक्षिणेकडील राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे.

विजय यांच्या पक्षाच्या मदुराईत झालेल्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक लोक जमले होते. विजय यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये टीव्हीके पक्षाची स्थापना केली. त्यानंतर गेल्या ऑक्टोबर महिन्यात पक्षाची पहिली जाहीर सभा विल्लूपूरम जिल्ह्यात आयोजित केली होती. त्यानंतर मदुराईत झालेली दुसरी सभा. दोन्ही सभांना प्रचंड गर्दी झाली होती. अर्थात, विजय यांना बघण्यासाठी गर्दी झाली होती, असाही अर्थ काढला जातो.

मदुराईच्या जाहीर सभेत विजय यांनी सत्ताधारी द्रमुकवर जोरदार हल्ला चढविला. आगामी वर्षात होणाऱ्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीके विरुद्ध द्रमुक असाच सामना होईल. अण्णा द्रमुक कोठेही स्पर्धेत नसेल, असे भाकित विजय यांनी या वेळी केले. आपला पक्ष भाजपशी कधीही हातमिळवणी करणार नाही, असेही विजय यांनी स्पष्ट केले. विजय यांची तमिळ चित्रपटश्रृष्ठीत प्रचंड लोकप्रियता आहे. त्यावर स्वार होऊनच विजय हे राजकीय नशीब आजमवून बघत आहेत.

विजय यांचा वापर भाजपकडून द्रमुकच्या विरोधात करण्यात येत असल्याची चर्चा असते. यामुळेच विजय यांना भाजपशी हातमिळवणी नाही हे स्पष्ट करावे लागले. भाजप किंवा हिंदुत्ववाद्यांकडून विजय जोसेफ असा वारंवार उल्लेख करून ते ख्रिश्चन असल्याचे मनावर बिंबविले जात आहे.

तमिळनाडूत एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी, जयललिता या चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी मुख्यमंत्रीपद अनेक वर्षे भूषविले. सुपरस्टार आणि थलावया रजनीकांत यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याचा मध्यंतरी प्रयत्न केला होता. पण राजकीय क्षेत्रात तग धरण्याबाबत ते साशंक होते. शेवटी त्यांनी राजकीय महत्त्वाकांक्षेला मूरड घातली. सध्या विजय हे तमिळनाडूतील सर्व प्रस्थापित राजकारण्यांना आव्हान देत आहेत.

तमिळनाडूत तमिळ अस्मितेबरोबरच विविध समाज घटकांची जोड निवडणुकीत यश मिळविण्यासाठी आवश्यक असते. अण्णा द्रमुकने भाजपशी हातमिळवणी केल्याने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मुस्लीम व ख्रिश्चन ही अल्पसंख्याकांची मते विरोधात गेली होती. त्याचा फायदा द्रमुकला झाला होता. विजय हे सर्व समाज घटकांना जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. सत्ताधारी द्रमुकबद्दलची विरोधी भावना, अण्णा द्रमुक कमकुवत होणे याचा फायदा उठविण्याचा विजय हे प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांना सर्व घटकांना आपलेसे करावे लागले. तमिळनाडूत विविध जातींची मते निर्णायक असतात.

एम.जी. रामचंद्रन, करुणानिधी, जयललिता यांनी चित्रपटाप्रमाणेच राजकीय पटलावर काळ गाजविला. कमल हसन यांच्या पक्षाचा फारसा प्रभाव पडला नाही. चित्रपट अभिनेता विजयाकांत यांच्या डीएमडीके पक्षाने २०११च्या निवडणुकीत २९ जागा जिंकून द्रमुकला आव्हान दिले होते. पण विजयकांत हे पुढे राजकीय आघाडीवर फारसे प्रभावी ठरले नाहीत. विजय यांच्याप्रमाणेच विजयकांत यांना मानणारा मोठा चाहता वर्ग होता. पण त्यांना राजकीय यश टिकविता आले नाही.

आंध्र प्रदेशात एन. टी. रामाराव, सध्याचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, माजी केंद्रीय मंत्री चिरंजीवी आदी चित्रपट क्षेत्रातील दिग्गज राजकीय पटावर चमकले. एन. टी. रामाराव यांनी तेलुगू अस्मितेच्या मुद्द्यावर आंध्र जिंकले होते. पण राजकीय वा प्रशासकीय पातळीवर ते यशस्वी झाले नाहीत. शेवटी त्यांचे जावई व सध्याचे मुख्यमंत्री नारा चंद्राबाबू नायडू यांनीच बंड केले. चिरंजीवी यांच्या प्रजाराज्यम पक्षाची एकदम हवा निर्माण झाली होती. पण चिरंजीवीही राजकीय यश टिकवू शकले नाहीत. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

विजय यांनी तमिळनाडूच्या राजकारणात हवा जरूर तयार केली आहे. पण निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी होण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल.