Tej Pratap Bihar Politics : बिहारमध्ये यावर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामागचे कारण म्हणजे, त्यांचे थोरले सुपुत्र तेजप्रताप यादव नव्या वादात सापडले आहेत. अगदी दोन दिवसांपूर्वी (शनिवार तारीख २४ मे) तेजप्रताप यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये त्यांचे एका तरुणीशी १२ वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात आले. मात्र, काही वेळातच ही पोस्ट डिलीट करण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण बिहारमध्ये खळबळ उडाली असून लालूंचा पक्ष चक्रव्यूहात अडकण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये यावर्षीच्या अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्यात सध्या सत्तेत असलेल्या भाजपा-जेडीयूला या निवडणुकीत सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे. कारण, राज्यातील प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या आरजेडीने सत्ताधाऱ्यांपुढे मोठं आव्हान उभं केलं आहे. लालू प्रसाद यादव यांचे धाकटे पुत्र तेजस्वी यादव यांनी बिहारमधील स्थलांतर तसेच बेरोजगारीच्या मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. याच मुद्द्याला हाताशी धरून ते मुख्यमंत्री नितीश कुमार व भाजपावर टीकेचे बाण सोडत आहेत.

लालू प्रसाद यादव यांचा पक्ष बॅकफुटवर?

एकीकडे तेजस्वी यादव व लालूप्रसाद यादव हे सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवत असताना दुसरीकडे तेजप्रताप यादव यांचे प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या हाती आयतं कोलीत सापडलं असून बिहार निवडणुकीआधी लालूप्रसाद यादव यांचा पक्ष काहीसा बॅकफुटवर गेल्याचं सांगितलं जात आहे. एकीकडे राजकीय लढाई आणि दुसरीकडे कौटुंबिक कलह यामध्ये लालूंची चांगलीच कोंडी झाली असून त्यातून सहजासहजी बाहेर त्यांच्यासाठी सोपे नसणार आहे.

आणखी वाचा : कोण आहेत ऐश्वर्या राय? त्यांनी तेज प्रताप यादव आणि कुटुंबावर काय आरोप केले?

लालूंच्या कुटुंबियांवर विविध घोटाळ्यांचे आरोप

लालूंचे कुटुंब आधीच विविध घोटाळ्यांच्या आरोपांचा सामना करीत आहे. स्वत: लालू प्रसाद यादव यांना शिक्षा झाली असून सध्या ते वैद्यकीय जामीनावर तुरुंगाबाहेर आहेत. तर रेल्वे टेंडर घोटाळ्यात लालूंसह त्यांच्या पत्नी राबडी देवी व पुत्र तेजस्वी यादव यांचे नाव आलं आहे. सध्या या सर्वांची केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे चौकशी सुरू आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीआधी भाजपाने बिहारमधील ‘जंगलराज’ हा जुना मुद्दा उचलून धरल्याने यादव कुटुंबाची पुरती कोंडी झाली आहे.

तेजप्रताप यांच्या पत्नीची न्यायालयात धाव

आधीच तेजप्रताप यादव व त्यांची पहिली पत्नी ऐश्वर्या राय यांच्यामध्ये घटस्फोटाची न्यायालयीन लढाई सुरू आहे. २०१८ मध्ये तेजप्रताप आणि ऐश्वर्या यांचा विवाह झाला होता. त्यानंतर सहा महिन्यांतच ऐश्वर्या यांनी लालूंच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली. तेजस्वी यादव व त्यांच्या आई राबडी देवी आपल्याला मारहाण करीत असल्याचा आरोप ऐश्वर्या यांनी केला आहे. त्यांनी लालूंच्या कुटुंबियांविरोधात कौटुबिक हिंसाचाराचा खटला दाखल केला आहे, हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे.

तेजप्रताप यादव यांची हकालपट्टी

तेजप्रताप यांचे प्रेमप्रकरण बाहेर आल्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी त्यांची पक्षासह कुटुंबातूनही हकालपट्टी केली आहे. तेजप्रताप यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. मात्र, ते शांत बसणारे नेते नाहीत, अपमानाचा बदला घेण्यासाठी व आरजेडीला आव्हान देऊन लालूंना जेरीस आणण्यासाठी तेजप्रताप नवीन पक्ष काढू शकतात, असे भाकीत राजकीय विश्लेषक वर्तवित आहेत. तेजस्वी यादव यांच्याप्रमाणेच गेल्या काही वर्षांत तेजप्रताप यादव यांनीही बिहारमधील तरुणवर्गावर चांगलीच छाप पाडली आहे. त्यांची एक युवक संघटना असून त्यामाध्यमातून ते आपले राजकीय प्रस्थ निर्माण करू शकतात, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

तेजप्रताप यादव म्हणतात, माझं अकाऊंट हॅक

तेजप्रताप यादव यांची फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काही वेळातच ही पोस्ट डिलीट करण्यात आली. “माझे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाले असून माझे फोटो चुकीच्या पद्धतीने एडिट करण्यात येत आहेत. यातून माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी केली जात आहे. मी माझ्या हितचिंतक आणि फॉलोअर्सना सांगू इच्छितो की, त्यांनी सावध राहावे आणि कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये”, असं तेजप्रताप यादव यांनी त्यांच्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा : India-Pakistan War : भारत-पाकिस्तानमधील तणाव खरंच अमेरिकेनं मिटवला? चीनची भूमिका काय होती?

सत्ताधाऱ्यांना मिळालं आयतं कोलीत

दरम्यान, तेजप्रताप यादव ज्या तरुणीबरोबर १२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत, त्याची माहिती यादव कुटुंबियांना नाही, असं लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी याच मुद्दाला हाताशी धरून लालूंना लक्ष्य केलं आहे. थोरल्या मुलाच्या कारनाम्याबद्दल लालूंना काहीच माहिती नाही, असं होऊच शकत नाहीत, अशी टीका भाजपा व जेडीयूचे नेते करीत आहेत. २०१८ मध्ये ऐश्वर्या यांच्यासोबत विवाह करताना तेजप्रताप यांनी आपल्या रिलेशनशिपबाबत माहिती दिली नसेल का? राजकीय फायद्यासाठी यादव कुटुंबियांनी ही माहिती लपवून ठेवली, असे असंख्य प्रश्न सत्ताधाऱ्यांकडून विचारले जात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेजप्रताप कायद्याच्या कचाट्यात अडकणार?

तेजप्रताप यादव व अनुष्का यादव यांच्या विवाहाचे व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसऱ्या तरुणीशी विवाह केल्याने तेजप्रताप यादव हे कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा संपूर्ण यादव कुटुंबियांनाच त्रास होऊ शकतो, असे कायदेतज्ञ सांगत आहेत. त्यामुळे तेजप्रताप यांची लव्हस्टोरी आता बिहारच्या राजकारणाला कोणत्या दिशेने घेऊन जाणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.