बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी काही दिवसांपूर्वीच ‘जनविश्वास यात्रे’ची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी मंगळवारी या यात्रेला सुरुवात केली. तेजस्वी यादव यांची १० दिवसीय ‘जनविश्वास यात्रा’ बिहारमधील ३३ जिह्यांमधून प्रवास करणार आहे. तसेच १ मार्च रोजी या यात्रेची सांगता होईल. दरम्यान, जनविश्वास यात्रा काढत तेजस्वी यादव यांनी एक प्रकारे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

मंगळवारी तेजस्वी यादव यांनी मुजफ्फरपुरमधून या यात्रेला सुरुवात केली. त्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीकाही केली. “नितीश कुमार यांच्याकडे राज्याच्या विकासासाठी दूरदृष्टी नाही. ते जुन्या विचाराचे नेते आहेत. इंडिया आघाडी सोडून ते भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये का गेले, याचं योग्य स्पष्टीकरणही त्यांना देता आलेलं नाही. त्यांना असं वाटतं की, ते लोकांचा जनादेश आपल्या पायाखाली तुडवू शकतात. त्यांना आता जनतेची भीती राहिलेली नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा – अखिलेश यांच्या ‘पीडीए’ सूत्राला पक्षांतर्गतच विरोध; ‘हे’ सूत्र समाजवादी पक्षासाठी किती फायद्याचे?

त्याशिवाय तेजस्वी यादव यांनी त्यांच्या पक्षाच्या सामाजिक धोरणाचे स्वरूप समजावून सांगताना ‘बाप’ ( BAAP) या शब्दाचा प्रयोग गेला. ते म्हणाले, ”अनेकदा आरजेडी हा मुस्लीम आणि यादवांचा पक्ष असल्याचे चित्र निर्माण केलं जातं. आमचा पक्ष M-Y पक्ष आहे, असं विरोधक म्हणतात. मात्र, आमचा पक्ष हा केवळ मुस्लीम आणि यादवांचा नाही, तर तो सर्वसमावेशक आहे. आमच्याकडे M-Y आणि त्याबरोबरच BAAP ही आहे.” पुढे बोलताना त्यांनी बाप म्हणजे काय याचा अर्थही सांगितला. ते म्हणाले, ”बाप म्हणजेच बहुजन (B), अगडा म्हणजे उच्चवर्णीय (A), आधी आबादी म्हणजे महिला (A ) व गरीब (P), असा सर्वांचा पक्ष आहे. एकंदरीत आमचा पक्ष ए टू झेड आहे.”

तेजस्वी यादव यांनी का काढली यात्रा?

नितीश कुमारांनंतर आपणच राज्यातील सर्वांत मोठे राजकीय नेते आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न तेजस्वी यादव यांना या यात्रेद्वारे करायचा आहे. तेजस्वी यादव एक प्रकारे स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांनी ही यात्रा काढली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

तेजस्वी यादव यांच्या यात्रेचे स्वरूप काय?

तेजस्वी यादव यांची ‘जनविश्वास यात्रा’ १० दिवस प्रवास करणार आहे. यादरम्यान ते बिहारमधील ३८ पैकी ३३ जिल्ह्यांना भेटी देतील. तसेच यावेळी तेजस्वी यादव सभादेखील घेणार आहेत. यावेळी ते जनतेला विशेषत: तरुणांना संबोधित करतील. तसेच ते पक्षाची धोरणे जनतेपर्यंत पोहोचवतील. त्याशिवाय आरजेडीकडून मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले जाण्याचीही शक्यता आहे.

हेही वाचा – मायावतींच्या बसपाने गोंडवाना पक्षाशी तोडली युती; लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यात्रेच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांना केले लक्ष्य

दरम्यान, या यात्रेच्या पहिल्या दिवशी तेजस्वी यादव यांनी त्यांच्या १७ महिन्यांच्या सरकारमध्ये आरजेडीने केलेली विविध विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. आम्ही सत्तेत असताना जवळपास चार लाख तरुणांना रोजगार दिला, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही लक्ष्य केले. तसेच त्यांनी रोजगारासंदर्भातील नितीश कुमार यांचा एक जुना व्हिडीओ देखील जनतेसमोर दाखवला. त्यामध्ये ते १० लाख नोकऱ्या देणे अशक्य असल्याचे म्हणत आहेत.