छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या नेतृत्चाखाली मध्य मतदारसंघातील १० माजी नगरसेवकांनी शुक्रवारी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्त्व स्वीकारले. अलिकडेच माजी महापौर नंदकुमार घोडले यांचाही शिवसेनेमध्ये प्रवेश झाला होता. सकाळीच प्रवेश घेऊ इच्छिणारे नगरसेवक मुंबईच्या दिशेने रवाना झाले. या मतदारसंघात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन आणि त्यांचा मुलगा ऋषी खैरे वगळता अन्य सर्व नगरसेवकांना आपल्या बाजूने वळविण्यात आमदार जैस्वाल यांना यश मिळाले आहे.

गेल्या काही दिवसापासून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शहरातील प्रत्येक वार्डात बैठका घेण्याचा सपाटा लावला होता. त्याला उत्तर म्हणून ठाकरे गटातून माजी नगरसेवकांना शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात ओढून घेतले जात आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी जिथे खैरे तिथे नंदकुमार घोडले असे चित्र होते. मात्र, घोडले यांनी ठाकरे गटाला सोडले. त्यानंतर माजी नगरसेवकांमधील मोठा गट शिवसेनेत जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. शुक्रवारी दहा जणांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्त्व स्वीकारले. यामध्ये महापालिकेचे माजी सभापती मोघन मेघावाले, माजी सभागृह नेता किशोर नागरे, गटनेते मकरंद कुलकर्णी, अनिल जयस्वाल, रुपचंद व्यवहारे, स्वाती नागरे, ज्योती वाघमारे, मीना गायके, ज्योती पिंजरकर, सीमा खरात यांचा समावेश आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील प्रभावी कार्यकर्त्यांना शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात घेण्यावर जोर दिला जात आहे. महापालिका निवडणुकीमध्ये भाजप – शिवसेना अशी युती होणार की स्वबळावर हे दोन पक्ष निवडणुका लढविणार याचे निर्णय होणे बाकी आहे. मात्र, शिवसेना (उद्धव ठाकरे ) पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याचा सपाटा शिवसेना – भाजपने सुरू केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेना (उद्धव ठाकरे ) पक्षातील कार्यकर्त्यांनी अलिकडेच एका मेळाव्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना जाहीरपणे सुनावले होते. आपसातील वाद कमी करा तरच लढता येईल असे सांगितले होते. या कार्यक्रमात अक्षरश: हात जोडून आता उद्धव ठाकरे यांना सोडून जाऊ नका, असे आवाहन चंद्रकांत खैरे यांना करावे लागले होते. त्यानंतरही गळती थांबता थांबेना अशी स्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना विचारले असता ‘जे गेले त्यांच्या विरोधातील अनेक कार्यकर्ते पर्याय म्हणून उभे आहेत. त्यामुळे स्थिती बिघडली आहे असे नाही. शिवसेना जेव्हा स्थापन केली होती तेव्हा आमच्याबरोबर जेवढे होते तिथपासून पुन्हा काम करण्याची तयारी आहे. त्यासाठी बैठका घेणे सुरू केले आहे,’ असे ते म्हणाले.