नाशिक: बऱ्याच भवती न भवतीनंतर राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी मुंबई येथे मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी महायुतीतील तीनही पक्षांचे प्रमुख नेते आणि अजित पवार गटाचे बहुतांश मंत्री उपस्थित होते. अपवाद होता तो भुजबळ यांचे कट्टर राजकीय विरोधक राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांचा. त्यांच्या अनुपस्थितीमुळे अजित पवार गटातील पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकसह येवला मतदारसंघात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोलताशे वाजवून, फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात भुजबळांना डावलून नाशिकमधून त्यांचे कट्टर राजकीय विरोधक माणिक कोकाटे यांच्यासह दिंडोरीचे नरहरी झिरवळ यांना पक्षाने संधी दिली होती. त्यावरून भुजबळांनी तीव्र संताप व्यक्त करीत पक्षाच्या नेत्यांवर आगपाखड केली होती. तेव्हा त्यांना प्रत्युत्तर देण्यास कोकाटे मैदानात उतरले होते. मराठा समाजाचे कोकाटे आणि ओबीसी नेते भुजबळ यांच्यात विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. कोकाटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. अजितदादांवरील भुजबळांच्या हल्ल्यांना कोकाटेंनी प्रत्युत्तर दिले होते.
आजवर पक्षाने छगन भुजबळ यांना जितका न्याय दिला, तितका कोणीही दिला नाही. मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसींवर अन्याय झालेला नाही. मंत्रिमंडळात ४२ पैकी १७ मंत्री ओबीसी तर, १६ मंत्री मराठा आहेत. भुजबळ यांना ओबीसी म्हणून केवळ ते स्वत:, मुलगा आणि पुतण्या दिसतो. बाकी कोणी दिसत नसल्याची टीका कोकाटे यांनी केली होती. या काळात स्थानिक समर्थक वगळता पक्षाचा जिल्ह्यातील एकही आमदार भुजबळ यांच्या पाठिशी उभा राहिला नव्हता. या परिस्थितीत भुजबळांच्या शपथविधी सोहळ्यास कोकाटेंनी अनुपस्थित राहून सूचक संदेश दिल्याचे मानले जाते. मुंबईतील सोहळ्यास अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ, शिक्षणमंत्री (शिंदे गट) दादा भुसे हे स्थानिक मंत्री उपस्थित होते. कोकाटेंनी मात्र या सोहळ्यास जाणे टाळले.
पूर्वपरवानगी घेऊनच अनुपस्थित
मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशीच छगन भुजबळ यांचा मुंबईत शपथविधी पार पडला. शपथविधीची कुणकुण लागताच कोकाटे यांनी आदल्या दिवशीच मंत्रिमंडळाच्या बैठकीसही काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकणार नसल्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवले होते. उभयतांच्या परवानगीनंतर कोकाटे अनुपस्थित राहिले. मंगळवारी सकाळी शपथविधी झाल्यानंतर दुपारी कोकाटे हे मुंबईकडे मार्गस्थ झाल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.