महेश सरलष्कर, मंत्रालयम (आंध्र प्रदेश)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘भारत जोडो’ यात्रा आंध्र प्रदेशचा चार दिवसांचा टप्पा पूर्ण करून पुन्हा कर्नाटकमध्ये गेली आहे. ही यात्रा रायचूर भागातून दोन दिवसांचा प्रवास करून तेलंगणामध्ये प्रवेश करेल. दक्षिणेकडील यात्रेचे हे अखेरचे राज्य असेल. त्यानंतर ती महाराष्ट्र आणि पुढे भाजपच्या मध्य प्रदेशसारख्या बालेकिल्यातील राज्यांमध्ये जाईल. या राज्यांमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेची खरी ताकद समजू शकेल.

काँग्रेस आणि नागरी समाजातून आलेले असे या यात्रेमध्ये दोन प्रकारचे यात्री आहेत. पण, आकर्षणाचे प्रमुख केंद्र अर्थातच राहुल गांधी. देशाच्या ग्रामीण भागात अजूनही गांधी घराण्यातील सदस्याला बघायला लोक रस्त्यावर येतात, पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला केलेले दोरखंडाचे सुरक्षाकवच ओलांडून मागे धावतात. सकाळच्या सत्रानंतर अदोनीमध्ये महाविद्यालयाच्या आवारात विश्रांती घेऊन राहुल गांधी यांनी संध्याकाळची पदयात्रा सुरू केली. राहुल गांधींना पाहायला लोकांनी दुतर्फा गर्दी केली होती. राहुल गांधींनी हात करून लोकांचे अभिवादन स्वीकारले. मोठ्या शहरांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जंगी स्वागत होते, तसेच राहुल गांधींचे स्वागत आंध्र प्रदेशच्या करनूल जिल्ह्यातील दुष्काळी भागातील लोकांनी केलेले दिसले. संसदेत मिठी मारणारे खासदार आणि रस्त्यावर आपुलकीने लोकांना जवळ करणारे राहुल गांधी यांच्यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक पाहायला मिळाला.

हेही वाचा… कोण आहेत अमोल काळे?

करनुल जिल्ह्यातील अलूर, अदोनी, मंत्रालयम अशी ही गावे कर्नाटकच्या सीमेवर वसलेली आहेत. कापूस उत्पादनात हा परिसर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुरुवारी संध्याकाळी मंत्रालयम गावाकडे जाताना राहुल गांधी यांनी पदयात्रा थांबवून कापूस उत्पादकांशी त्यांच्या शेतात जाऊन भेट घेतली. सुमारे ४५ मिनिटे चर्चा केल्यानंतर त्यांनी उर्वरित यात्रा पूर्ण केली. मंत्रालयम हे राघवेंद्र स्वामी मठासाठी प्रसिद्ध आहे. इथे अनेक महत्त्वाकांक्षी राजकारणी आशीर्वाद घेऊन गेले आहेत. कोणी मुख्यमंत्री बनले तर, कोणी केंद्रात मंत्री. या मठात जाऊन गुरुवारी राहुल गांधी यांनीही आशीर्वाद घेतले.

हेही वाचा… दिल्लीत बंदी असताना आप मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले; भाजपा म्हणाली, “केजरीवाल हिंदू विरोधी…”

काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्ष कोणी असो, खरी सत्ता गांधी कुटुंबाकडेच असल्याची वस्तुस्थिती इथे पाहायला मिळाली. आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसकडे सत्ता नाही, प्रदेश काँग्रेस खिळखिळी झाली असून त्यांच्याकडे निधीचा तुटवडा असावा. आंध्र प्रदेशमधील ‘भारत जोडो’ यात्रेचे आयोजन कर्नाटकातील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील दिग्गज नेते डी. के. शिवकुमार यांच्या वतीने करण्यात आल्याची चर्चा रंगलेली होती. शिवकुमार यांनी अदोनीला भेटही दिली. तिथून ते राहुल गांधी यांच्यासोबत राघवेंद्र स्वामींच्या मठामध्येही गेलेले दिसले! काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी ताटकळत होते. काँग्रेसमध्ये राहुल गांधी हेच सर्वोच्च नेते आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. ‘राहुल गांधींनी पाच मिनिटे वेळ दिली, माझ्या कुटुंबाची त्यांनी चौकशी केली’, असे महिला कार्यकर्ती सांगत होती. राहुल गांधी कार्यकर्त्यांना अधिक वेळ देत असल्याचे यात्रेमध्ये तरी पाहायला मिळाले.

हेही वाचा… जयललिता मृत्यू चौकशी अहवाल : कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार, शशिकला यांनी सर्व आरोप फेटाळले

हेही वाचा… तुम्हाला माहितीये का मोती साबण अन् दिवाळीचं नातं कसं जुळलं? हा साबण दिवाळीत वापरण्यास सुरुवात कधी झाली?

दिवाळीनिमित्त २४ व २५ ऑक्टोबर हे दोन ‘भारत जोडो’ यात्रेसाठी विश्रांतीचे असतील. २६ ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे नवनियुक्त पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना निवडणूक प्रमाणपत्र दिले जाणार असून राहुल गांधीही उपस्थित राहतील. २७ ऑक्टोबरपासून यात्रा पुन्हा सुरू होईल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The attraction of bharat jodo yatra is the same print politics news asj
First published on: 21-10-2022 at 10:40 IST