राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे पुत्र व बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून व्हायरल झालेल्या फेसबुक पोस्टनंतर स्वतः लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्याविरोधात कारवाई करीत त्यांना कुटुंबासह पक्षातून निलंबित केले आहे. त्यांच्या पोस्टनंतर सध्या एक नाव चर्चेत आहे आणि ते म्हणजे अनुष्का यादव. त्या नक्की कोण आहेत? तेज प्रताप यादव कसे अडचणीत सापडले? जाणून घेऊ…

तेज प्रताप यादव यांची फेसबुक पोस्ट

तेज प्रताप यादव यांनी फेसबुक प्रोफाइलवर एका महिलेबरोबरील पोस्ट शेअर केल्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये अनुष्का यादव नामक महिलेशी प्रेमसंबंध असून, १२ वर्षांपासून आपण एकत्र असल्याचा दावा केला होता. तसेच आता ही गोष्ट आपण सर्वांसमोर उघड करीत आहोत, असेही त्यांनी कबूल केले होते. मात्र, त्यानंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली. तेज प्रताप यादव यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये लिहिले, “माझा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हॅक करण्यात आला आहे.”

ते पुढे म्हणाले, “माझे फोटो चुकीचे एडिट करून, मला आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना त्रास दिला जात आहे आणि त्यांची बदनामी केली जात आहे. मी माझ्या हितचिंतकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन करतो,” असे त्यांनी म्हटले. ही पोस्ट डिलीट करण्याआधीच प्रचंड व्हायरल झाली आणि त्यानंतर तब्बल सहा वर्षांसाठी त्यांची पक्ष आणि कुटुंबातून हकालपट्टी करण्यात आली. तेज प्रताप यादव यांच्या पोस्टनंतर आणि त्यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर पोस्टमधील महिलेविषयी जाणून घेण्यात वापरकर्त्यांमध्ये रस निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

अनुष्का यादव कोण आहेत?

अनुष्का यादव यांची सार्वजनिक क्षेत्रात जास्त माहिती उपलब्ध नाही. मात्र, त्यांचे आरजेडी कनेक्शन आता समोर आले आहे. प्राप्त माहितीनुसार, अनुष्का यादव यांचे कुटुंब पाटण्याच्या लंगरटोली येथे वास्तव्यास आहे. त्यांच्या वडिलांचे नाव मनोज यादव आहे. अनुष्का या आरजेडीच्या विद्यार्थी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष आकाश यादव यांची बहीण असल्याचेही सांगितले जात आहे.

तेज प्रताप यादव यांनीच आकाश यादव यांना आरजेडीच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. परंतु, आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी नंतर आकाश यांना पदावरून काढून टाकले आणि त्यांच्या जागी गगन यादव यांची नियुक्ती केली. आकाश यादव यांनी तेज प्रताप यांचा गट सोडला आणि तेज प्रताप यांचे राजकीय प्रतिस्पर्धी पशुपती पारस यांच्या गटात ते सामील झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लालू प्रसाद यादव काय म्हणाले?

“मोठ्या मुलाचे व्यवहार, सार्वजनिक आणि बेजबाबदार वर्तन आमच्या कौटुंबिक मूल्ये आणि संस्कारांच्या विरोधात आहे. त्याच्या या कृत्याने मी त्याला पक्ष आणि कुटुंबातून बाहेर केले आहे. आजपासून त्याची पक्ष आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारची भूमिका राहणार नाही. त्याला सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील चांगले-वाईट आणि गुण-दोष पाहण्यास सक्षम आहे. त्याच्याशी संबंध ठेवणाऱ्या सर्वांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत. मी नेहमीच सार्वजनिक जीवनात वावरताना योग्य ती काळजी घेतली आहे. कुटुंबातील आज्ञाधारक सदस्यांनी सार्वजनिक जीवनात ही कल्पना स्वीकारली आहे आणि त्याचे पालन केले आहे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले.