राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या मुलाविरोधात मोठी कारवाई केली आहे. त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांनी सोशल मीडियावर एका महिलेबरोबरचे फोटो पोस्ट केल्यानंतर आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादव यांचे पक्षातून निलंबन केले आहे आणि कुटुंबातूनदेखील सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. लालू प्रसाद यांनी आपल्या निर्णयाविषयी ‘एक्स’वर लिहिले, “वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठीचा आपला संघर्ष कमकुवत होतो.” लालू प्रसाद यादव यांच्या निर्णयामागील कारण काय? सोशल मीडियावरी पोस्टमुळे ही कारवाई का करण्यात आली? एकूणच या प्रकरणाविषयी जाणून घेऊ…

लालू प्रसाद काय म्हणाले?

“मोठ्या मुलाचे व्यवहार, सार्वजनिक आणि बेजबाबदार वर्तन हे आमच्या कौटुंबिक मूल्ये आणि संस्कारांच्या विरोधात आहे. त्याच्या या कृत्यामुळे मी त्याला पक्ष आणि कुटुंबातून बाहेर करत आहे. आजपासून त्याची पक्ष आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारची भूमिका राहणार नाही. त्याला सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील चांगले-वाईट आणि गुण-दोष पाहण्यास सक्षम आहे. त्याच्याशी संबंध ठेवणाऱ्या सर्वांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत. मी नेहमीच सार्वजनिक जीवनात वावरताना योग्य काळजी घेतली आहे. कुटुंबातील आज्ञाधारक सदस्यांनी सार्वजनिक जीवनात ही कल्पना स्वीकारली आहे आणि त्याचे पालन केले आहे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले.

सोशल मीडियावरील पोस्ट

तेज प्रताप यादव यांनी फेसबुक प्रोफाइलवर एका महिलेबरोबरील पोस्ट शेअर केल्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये अनुष्का यादव नामक महिलेशी प्रेमसंबंध असून १२ वर्षांपासून आपण एकत्र असल्याचा दावा केला होता. तसेच आता ही गोष्ट आपण सर्वांसमोर उघड करीत आहोत, असे कबूल केले होते. मात्र, त्यानंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली. तेज प्रताप यादव यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये लिहिले, “माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हॅक करण्यात आले आहे आणि माझे फोटो चुकीचे एडिट करून मला आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना त्रास दिला जात आहे आणि त्यांची बदनामी केली जात आहे. मी माझ्या हितचिंतकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन करतो,” असे त्यांनी म्हटले.

तेज प्रताप यादव आणि त्यांच्याभोवतीचे वाद

२०१५ ते २०१७ पर्यंत बिहारचे आरोग्यमंत्री म्हणून काही काळ काम केलेले तेज प्रताप यादव बिहारच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. तेज प्रताप हे तेजस्वी प्रसाद यादव यांच्यापेक्षा वयाने मोठे असले तरी ते अधिकृत कागदपत्रांमध्ये तेजस्वी यांच्यापेक्षा वयाने लहान असल्याचे दाखवले जाते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बंडखोरी करीत तेज प्रताप यादव यांनी तीन समर्थकांना अपक्ष म्हणून उभे केले होते. त्यानंतर त्यांनी आपला विरोध नोंदविण्यासाठी लालू-राबडी मोर्चाची स्थापना केली. त्यावेळी काही प्रमाणात का होईना; परंतु त्यांच्या नावाची चर्चा झाली होती.

२०२० मध्ये तेज प्रताप यादव अचानक आजारी पडले तेव्हा त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्या भेटीसाठी गेले. त्यानंतर महाआघाडीच्या जागावाटपाच्या घोषणेत दोन्ही भाऊ एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसले. तेज प्रताप यांना त्यांच्या काही उमेदवारांना तिकीट मिळावी, अशी इच्छा होती. त्यापैकी किती जणांना तिकिटे मिळाली, हे स्पष्ट नाही. मात्र, जिंकण्याची शक्यता जास्त असल्याने पक्षाने त्यांना त्यांच्या विद्यमान महुआ (वैशाली) मतदारसंघातून हसनपूर (समस्तीपूर) येथील तिकीट दिले होते. तेज प्रताप यांनी राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून काम केले आहे; मात्र ते प्रशासकीय कौशल्यासाठी ओळखले जात नाहीत.

स्वतःच्या जगात रमणारे व्यक्तिमत्त्व

तेज प्रताप यादव यांचे स्वतःचे जग आहे, त्यांच्या समर्थकांपैकी काही जण त्यांना ‘तेजू भैया’ म्हणतात. ते एका वेगळ्या बंगल्यात राहतात. हा बंगला योगायोगाने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दोन्ही पक्षांच्या युतीदरम्यान दिला होता. त्यांचे आवडते देव कृष्णाप्रमाणेच तेज प्रताप अनेकदा बासरी वाजवितानाचे फोटो काढतात. त्यांना स्वतःची आणि तेजस्वी यादव यांची तुलना कृष्णा आणि त्यांचा शिष्य अर्जुनाशी करायला आवडते. त्यांना मोटरसायकल आणि विमान उडवण्याचीदेखील आवड आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते वैमानिकाचा परवाना मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचेही म्हटले जाते. त्यांच्या जन्माच्या वेळी वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे त्यांना तेज हे नाव देण्यात आल्याचे म्हटले जाते. तेजस्वी यादव लालू प्रसाद यादव यांचे वारस म्हणून उदयास येऊ लागल्यानंतर तेज प्रताप यादव यांना राजकारणात रस निर्माण झाला. तेज प्रताप यांनी धर्मनिर्पेक्ष सेवक संघ (डीएसएस) नावाची महत्त्वाकांक्षी संघटना स्थापन केली. मात्र, ही संघटना आता जवळजवळ निष्क्रिय आहे. कौटुंबिक कलहानंतर सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या तेजस्वी यांना तेज प्रताप कोणत्या समस्या निर्माण करू शकतात याची जाणीव आहे आणि त्यामुळे कदाचित ते त्यांच्या भावाच्या पुढील हालचालींवर विशेष लक्ष ठेवतील.