दोन किंवा दोनपेक्षा अधिक पक्षांची निवडणूक आघाडी करणे तसे सोपे नसते. कुणाविरोधात निवडणूक लढवायची आहे, हे आघाडीतील पक्षांना माहीत असले किंवा त्यावर एकमत असले तरी, आघाडीत आपापल्या पक्षाचे वर्चस्व राखण्यासाठी किंवा नसलेले वर्चस्व वाढविण्यासाठी निवडणुकांच्या आधी अशा आघाड्यांमध्येच एकमेकांच्या विरोधात कुरघोडीचे राजकारण खेळले जाते. अशाच प्रकारे महाविकास आघाडीत सध्या निवडणूकपूर्व दबावतंत्रा खेळ सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या विरोधात तयार झालेल्या महाविकास आघाडीत शिवेसना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख तीन पक्ष आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यानंतर सहा महिन्यांत लगेच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. कदाचित देशातील किंवा राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेता, लोकसभा व राज्य विधानसभेच्या एकाच वेळी निवडणुका होण्याची शक्यताही राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. तूर्तास लोकसभा निवडणुकीची तरी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा – चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा तीन तिघाडा काम बिघाडा…

महाविकास आघाडीत सर्वात कळीचा मुद्दा ठरणार आहे तो जागा वाटपाचा. त्यात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांच्या आधारावर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ राहण्याचा प्रयत्न करणार असून, केवळ कशीबशी एक जागा जिंकलेल्या काँग्रेसला कोपऱ्यात ढकलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसते. परंतु काँग्रेस मागे हटेल अशी शक्यता नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेच्या जागावाटपाबाबत त्यांच्या-त्यांच्या स्वंतत्र बैठका न होताच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत २०१९ मध्ये जिंकलेल्या १८ जागांवर दावा सांगत आहेत, तर, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या २३ जागा सोडून भाजपकडे असलेल्या २५ जागांवर आधी चर्चा झाली पाहिजे, असा सूर अजित पवार यांनी लावला आहे. एक प्रकारे पवार राऊतांच्या भूमिकेचे समर्थन करीत आहेत. काँग्रेसने त्यावर प्रतिवाद न करता तातडीने मंगळवारी प्रदेश कायर्कारिणीची बैठक बोलावून जागावाटपाच्या वाटाघाटीत आक्रमक राहण्याचे ठरविले. अजित पवार व संजय राऊत यांच्या जिंकलेल्या जागांवर दावा सांगणाऱ्या विधानांवर संयमपणे भाष्य करताना जागावाटपाचे असे अजून कोणतेही सूत्र ठरलेले नाही, असे सांगत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या दोन्ही नेत्यांची वक्तव्ये निरर्थक असल्याचे सूचित केले. मात्र त्याचबरोबर मागील विधान परिषदेच्या निवडणुका व कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील निकालाचा हवाला देत काँग्रेसची ताकद वाढली आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, असे सांगत जागावाटपात काँग्रेस कमीपणा घेणार नाही, असे शिवसेना व राष्ट्रवादीला पटोले यांनी अप्रत्यक्षरित्या इशाराच दिला आहे.

हेही वाचा – जयदत्त क्षीरसागर यांची राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार व संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे जिंकलेल्या जागा त्या त्या पक्षांनी घ्यायचे ठरले तर, शिवसेनेकडे १८, राष्ट्रवादीकडे ४ आणि काँग्रेला फक्त एकच जागा मिळेल. भाजपकडील २५ जागांच्या वाटपाबाबत काय निकष लावायचा याची अजून चर्चा नाही. किंवा त्यावर कुणी भाष्य केले नाही. परंतु सर्वसाधारणपणे दुसऱ्या क्रमांकाच्या मतांचा निकष लावला तरी एकुणात काँग्रेसला फारच पिछाडीवर जावे लागेल. त्यामुळेच पुढील आठवड्यात जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पुढील रणनीती काँग्रेस ठरविणार आहे. काँग्रेस आघाडीला जागावाटपाचा पहिला प्रस्ताव देणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले आहे. भाजपविरोध हा महाविकास आघाडीचा समान मुद्दा असला तरी, जागावाटपावरून तिन्ही पक्षांत सध्या तरी एकमेकांवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसते.