नितीन पखाले

यवतमाळ : भाजप, काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी असा प्रवास करीत बंजारा, भटके विमुक्त आणि ओबीसींचे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची राजकीय स्थैर्यासाठी चाललेली धडपड अद्यापही संपली नाही. शिवसेनेला जय महाराष्ट्र करून आम आदमी पक्षात गेल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच हरिभाऊ राठोड यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा हात पकडला आहे.

हरिभाऊ राठोड यांनी रविवारी नांदेड येथे चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचा झेंडा हाती घेतल्यानंतर बंजारा, भटके विमुक्त आणि बहुजन समाजाचे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मंत्रालयात शासकीय सेवेत असलेल्या हरिभाऊ राठोड यांच्यातील संघटन कौशल्य हेरून भाजपचे तत्कालीन नेते, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना राजकीय क्षेत्रात पुढे आणले. त्यापूर्वीच हरिभाऊ राठोड यांनी बहुजन महासंघाची स्थापना केली होती. गोपीनाथ मुंडेंचा सहवास लाभताच हरिभाऊ राठोड यांचे राजकीय भविष्य फळास आले. यवतमाळ मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. अणुकराराच्या मुद्यावरून मनमोहनसिंग सरकार अल्पमतात आल्यानंतर हरिभाऊ राठोड सभागृहात गैरहजर राहिल्याने भाजप तोंडघशी पडला होता. काँग्रेसशी हातमिळवणी केल्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर पाठविले. आमदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर हरिभाऊ राठोड यांनी २०१९ मधील लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेशी मैत्री करून पाठिंबा दिला. शिवसेनेच्या विजयात आपला सिंहाचा वाटा असूनही त्यानंतर सत्तेत आलेल्या शिवसेनेने आपली दखल घेतली नाही ही खंत उराशी बाळगून हरिभाऊ यांनी ‘आप’चा झाडू हाती घेतला. आप पक्षानेही त्यांना पक्षाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. मात्र अवघ्या सहा, सात महिन्यांतच हरिभाऊ राठोड यांनी आम आदमी पक्षाला रामराम ठोकून आता शेतकरी हिताचा पक्ष म्हणून पुढे आलेल्या तेलंगणातील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत नांदेड येथे प्रवेश घेतला.

हेही वाचा… काँग्रेसनिष्ठा खुंटीला टांगून धर्मण्णा सादूल भारत राष्ट्र समितीत

अविश्वास ठरावाच्या वेळी गद्दारी केल्यामुळे हरिभाऊ राठोड यांना भाजपने कायमचेच दूर लोटले. त्यानंतर काँग्रेसमध्येही त्यांना आमदारकी पलिकडे फारसे महत्व देण्यात आले नाही. शिवसेनेत यवतमाळात संजय राठोड हेच एकमेव नेते असल्याने हरिभाऊ पक्ष आणि कार्यकर्त्यांकडूनही दुर्लक्षित राहिले. जिल्ह्यात आपचे अस्तित्व आणि कार्यकर्तेही नसल्याने काम करण्यास कोणताच वाव नव्हता. त्यामुळे पक्ष बदलाशिवाय दुसरा पर्याय हरिभाऊंकडे नसल्याने त्यांनी बीआरएसचा पर्याय स्वीकारला असावा, असे बोलले जात आहे.

हेही वाचा… मालेगावात मुस्लीम समुदायाबरोबर जोडण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न

‘बीआरएस’ पक्षातील प्रवेशाबाबत हरिभाऊ राठोड यांना विचारणा केली असता, हा पक्ष भविष्यात शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पश्चिम महाराष्ट्र वगळता विदर्भ, मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र आदी भागातील भटके विमुक्त, बंजारा, ओबीसी आपल्या सोबत असून आपण ‘बीआरएस’चे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नेतृत्व करू, असे हरिभाऊ राठोड म्हणाले. आजपर्यंत भाजप, काँग्रेस, शिवसेना, आप या पक्षांना आपले महत्व कळले नाही. त्यांना पक्षवाढीसाठी आपला उपयोग करून घेता आला नाही, अशी टिपणीही त्यांनी केली. बीआरएसमध्ये दाखल होताच हरिभाऊ राठोड राजकारणात सक्रिय झाले असून २९ मार्चला त्यांनी बंजारा समाजाचे दैवत असलेल्या पोहरादेवी येथे जाहीर सभेचे आयोजन करून शक्तीप्रदर्शनाची तयारी चालविली आहे. या सभेस तेलंगणातील अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. अनेक पक्ष फिरून भारत राष्ट्र समितीत प्रवेश केलेले राठोड तेथेही स्थिरावतात का याची उत्सुकता असेल.