मुंबई : मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील कुटुंब आणि पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिवर्ष तीन मोफत स्वयंपाकाचा सिलिंडर देणाऱ्या ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’चा शासन निर्णय अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने मंगळवारी प्रसिद्ध केला आहे. एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र असणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील ५२ लाख १६ हजार ४१२ पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. सरकारने आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील पात्र लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश केला आहे. योजनेसाठी एका कुटुंबात (शिधापत्रिकेप्रमाणे ) एक लाभार्थी पात्र असेल. हा लाभ १४.२ किलो ग्रॅम वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना देण्यात येईल.

हेही वाचा >>>अरविंद केजरीवलांनंतर ‘आप’च्या आणखी एका नेत्याला होणार अटक? कोण आहेत दुर्गेश पाठक?

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे नियमित वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते. मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेंतर्गत द्यावयाच्या ३ मोफत सिलिंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बँक खात्यात रक्कम जमा

केंद्राकडून उज्ज्वला योजनेंतर्गत ३०० रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. आता उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थींना ५३० रुपये राज्य शासन देईल. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींच्या कुटुबांच्या बँक खात्यात प्रति सिलिंडर ८३० रुपये शासन जमा करणार आहे.