आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फोडण्यासाठी राज्यात तिसऱ्या आघाडीला भाजप बळ देत असून त्याविरोधात ‘इंडिया’कडून रणनिती निश्चित केली जात असल्याची माहिती या घडामोडींशी निगडीत सूत्रांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधींशी शुक्रवारी दिल्लीत चर्चा बैठक झाली होती. त्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी जवळीक साधण्यावर चर्चा झाल्याचे समजते. राज्यात भाजप प्रामुख्याने मराठा-ओबीसी मतांवर अवलंबून आहे. गेल्या विधानसभा तसेच, लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने भाजपेतर पक्षांची प्रामुख्याने काँग्रेसची मते फोडली होती. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला किमान ८ जागांवर पराभव पत्करावा लागल्याचे मानले गेले होते. यावेळी मतांची ही फूट टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा – मणिपूरमध्ये घटनेचे अनुच्छेद ३५५ लागू? भाजपा नेत्यांनाही संशय, अनुच्छेद ३५५ म्हणजे काय?

वंचित बहुजन आघाडी व एमआयएम हे दोन्ही पक्ष भाजपचा ‘ब’ चमू असल्याची चर्चा होत असल्याने या पक्षांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांच्या विभागणीसाठी केवळ या दोन पक्षांवर अवलंबून चालणार नाही तर राज्यात चार-पाच छोट्या पक्षांची तिसरी आघाडी उभारावी लागेल असा विचार भाजपचे केंद्रीय नेतृत्व करत असल्याचे सांगितले जाते. त्याचाच भाग म्हणून तेलंगणातील के. चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती राज्यात सक्रिय झाल्याचे मानले जाते. मराठवाड्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातही भारत राष्ट्र समितीकडून फलकबाजी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत भारत राष्ट्र समितीकडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना-ठाकरे यांच्या गेल्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाच्या प्रभावी नेत्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. तिसऱ्या आघाडीमध्ये भारत राष्ट्र समितीसह वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा छोट्या पक्षांना सामावून घेतले जाऊ शकते. या तिसऱ्या आघाडीला विविध स्वरुपामध्ये राजकीय बळही दिले जाण्याची शक्यता असल्याचा दावा महाविकास आघाडीतील सूत्रांनी केला.

हेही वाचा – ‘भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता मिळाली तर जनेतला पश्चाताप व्यक्त करावा लागेल’, केरळच्या मुख्यमंत्र्यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील संभाव्य घडामोडींमुळे महाविकास आघाडीतील जागावाटपातील गुंतागुंत वाढली आहे. गेल्या लोकसभेत भाजपने जिंकलेल्या २३ जागांवर महाविकास आघाडीतील तीनही पक्ष दावा करत आहेत. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले तर विदर्भात काँग्रेसला अधिक जागावाटप होऊ शकेल. पण, लोकसभा निवडणुकीत जिंकण्याची क्षमता असलेल्या ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी देण्यावर काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व गांभीर्याने विचार करत असल्याचे समजते. त्यातील काही ज्येष्ठ नेत्यांना दिल्लीपेक्षा राज्यात राहण्याची इच्छा आहे. हे नेते त्यांच्या मुला-मुलींना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण, त्यांना तिकीट देण्यास पक्षाचे केंद्रीय नेतृत्व उत्सुक नाही. लोकसभेच्या शंभरहून अधिक जागा मिळवण्याचे काँग्रेसचे लक्ष्य असल्याने राज्यात ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले पाहिजे असा संदेश काँग्रेस नेतृत्वाने दिला असल्याचे समजते.