Top Political News in Today : आज दिवसभरात राज्यासह देशभरात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. १) लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा अपात्र ठरलेल्या आणि लाभ मिळणे बंद झालेल्या लाभार्थ्यांना होणार आहे. २) मुंबईत ठिकठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर झळकले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या जाहिरातीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ३) अमोल मिटकरी यांनी IPS अंजली कृष्णांच्या चौकशीची मागणी केली होती. मात्र, आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ४) शाळांतील त्रिभाषा धोरणासाठी अखेर दोन महिन्यांनी सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ५) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे खास मित्र असल्याचे म्हटले आहे. या सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊयात…
लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारचा निर्णय
लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या आणि लाभ मिळणे बंद झालेल्या लाभार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची शासनस्तरावर नियमित पडताळणी केली जात आहे. या पडताळणीत अनेक अपात्र लाभार्थी योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले. त्यानंतर अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मोठ्या संख्येनी लाभार्थी अपात्र ठरविण्यात आल्यामुळे सरकारवर टीका केली जात होती. परिणामी, आता अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांना शेवटची संधी देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून अपात्र लाभार्थ्यांची फेरपडताळणी केली जाणार आहे. लाभार्थ्यांनी पडताळणीस प्रतिसाद द्यावा असे, आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.
फडणवीसांच्या जाहिरातीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत हजारो मराठा आंदोलक जमले होते. त्यांच्या मागण्यांवर निर्णय घेतल्यानंतर भाजपाकडून मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात येत आहे. त्यासाठी ‘देवाभाऊ’ हे कॅम्पेन राबविण्यात आले आहे. राज्यातील प्रमुख वृत्तपत्रात जाहिरात देऊन आणि मुंबईत काही ठिकाणी बॅनर लावून ‘देवाभाऊ’ हे कॅम्पेन राबविण्यात आले आहे. या कॅम्पेनवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “श्रेयवादाच्या लढाईत आम्ही नाही. मराठा समाज आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याचे काम महायुती सरकार करत आहे. महायुती सरकारने मागच्या अडीच वर्षांत केलेल्या कामाची पोचपावती आम्हाला गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत विजयाच्या रूपात मिळाली. देवेंद्रजी आणि आम्ही दुसरी इंनिग सुरू केली आहे, यापुढेदेखील असेच काम करत राहू; हाच आमचा अजेंडा आहे.”
IPS अंजली कृष्णांच्या चौकशीची मागणी करणाऱ्या मिटकरींकडून दिलगिरी व्यक्त
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला दम दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट या महिला अधिकाऱ्याच्या नियुक्तीत घोळ झाल्याचा संशय व्यक्त केला होता आणि थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाला पत्र पाठवले होते. दरम्यान, आता मिटकरी यांनी आपले मत बदलले असून याप्रकरणात दिलगिरीदेखील व्यक्त केली आहे. त्यांनी मांडलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक होती, त्यांच्या पक्षाचा या भूमिकेशी काहीही संबंध नसल्याचेदेखील मिटकरी यांनी स्पष्ट केले आहे. “सोलापूर घटनेसंदर्भात केलेलं ट्विट मी बिनशर्त मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो. ही माझ्या पक्षाची भूमिका नव्हती तर माझी वैयक्तिक भूमिका होती. आपले पोलिस दल व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे,” असे त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले.
शाळांतील त्रिभाषा धोरणासाठी सदस्यांची नियुक्ती
राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये त्रिभाषा धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी डॉक्टर नरेंद्र जाधव समिती स्थापन केली होती. अखेर समितीच्या सात सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक डॉ. वामन केंद्रे, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अपर्णा मॉरिस, डेक्कन कॉलेजमधील भाषा विज्ञान प्रमुख सोनाली कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ डॉ. मधुश्री सावजी, बालमानसतज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल, समग्र शिक्षण अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांचा समावेश आहे. राज्यात पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा अनिवार्यपणे शिकवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता, मात्र राज्यभरातून होत असलेला विरोध पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाला स्थगिती देऊन राज्यातील शाळांतील त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याची घोषणा केली होती.
ट्रम्प यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक
भारत-अमेरिका संबंधांबद्दल त्यांना विचारले असता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ते नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मित्र राहतील. याचबरोबर भारत-अमेरिकेतील संबंध खास असल्याचेही त्यांनी म्हटले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “मी नेहमीच पंतप्रधान मोदींचा मित्र राहीन. ते एक महान पंतप्रधान आहेत. पण, सध्या मला त्यांची काही धोरणे आवडत नाहीत. भारत आणि अमेरिकेचे संबंध खूप खास असले तरी काळजी करण्यासारखे काही नाही, कधीकधी असे क्षण येतात.”