Top Political News in Today : आज दिवसभरात मुंबईपासून ते आंतराराष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. चीनमधील शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत मोदींनी पाकिस्तानला खडसावलं, तर याच परिषदेतील एका प्रसंगावरून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना त्यांच्याच देशातील नागरिकांनी ट्रोल केलं. पंतप्रधान मोदी व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या चीनमधील भेटीनंतर अमेरिकेला भारताची मैत्री आठवली. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कथित मतचोरीच्या मुद्द्यावरून भाजपासह निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. मुंबईत सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले. त्या संदर्भात सविस्तर जाणून घेऊ…
पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला कसं खडसावलं?
चीनमधील तियान्जिन शहरात शांघाय सहकार्य संघटनेची (SEO) शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दौऱ्यावर आहेत. आज सर्व राष्ट्रप्रमुखांच्या संयुक्त बैठकीत पंतप्रधानांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला चांगलेच खडेबोल सुनावले. पाकिस्तानचे नाव न घेता पंतप्रधान मोदी म्हणाले, “दहशतवाद, फुटीरतावाद व अतिरेकीवाद ही आपल्यासमोरील सर्वांत मोठी आव्हाने आहेत. कोणताही देश, कोणताही समाज त्यापासून स्वतःला सुरक्षित मानू शकत नाही. त्यामुळेच भारताने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकतेवर भर दिला आहे. गेल्या चार दशकांपासून भारत दहशतवादाने त्रस्त आहे. त्यामुळे कित्येकांना निष्कारण जीव गमवावे लागले. इतकी मुले अनाथ झाली. अलीकडेच, पहलगाममध्ये दहशतवादाचे एक अतिशय घृणास्पद रूप आपण पाहिले आहे.”
मोदींनी आपल्या भाषणात एप्रिलमध्ये झालेला पहलगाम दहशतवादी हल्ला, तसेच दहशतवादी संघटना ‘अल कायदा’चा थेट उल्लेख केला. “पहलगाममध्ये आम्ही दहशतवादाचे एक अत्यंत घृणास्पद रूप पाहिले आहे. दुःखाच्या या प्रसंगी आमच्यासोबत उभ्या राहिलेल्या मित्रराष्ट्रांचे मी आभार मानतो. हा हल्ला केवळ भारताच्या विवेकावर झालेला आघात नव्हे, तर मानवतावादी विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर तो झाला होता“, असंही ते म्हणाले.
आणखी वाचा : गैरसोय होऊनही मराठे मुंबईतच ठाण मांडून; आता न्यायालयाच्या आदेशानंतर पुढे काय?
अमेरिकेला नेमकी का आठवली भारताची मैत्री?
सध्या चीनच्या तियान्जिन शहरात शांघाय सहकार्य संघटनेची बैठक सुरू आहे. या बैठकीतले अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या एक्स अकाऊंटवर ते शेअर केले आहेत. त्यात मोदी पुतिन यांची गळाभेट घेताना दिसत आहेत. यादरम्यान- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध हे नवीन उंची गाठत राहातील अशी पोस्ट केली आहे. “या महिन्यात आपण, आपल्याला पुढे घेऊन जात असलेले लोक, प्रगती आणि संधींवर लक्ष केंद्रित करीत आहोत. नवे उपक्रम आणि उद्योजकता यांपासून संरक्षण आणि द्विपक्षीय संबंधांपर्यंत आपल्या दोन्ही बाजूंच्या नागरिकांची टिकून राहिलेली मैत्री ही आपल्या या प्रवासाला ऊर्जा देते,” असं रुबिया यांनी म्हटलं आहे. विशेष बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी भारतावर ५० टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान का होताहेत ट्रोल?
शांघाय सहकार्य संघटनेतील बैठकीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग परिषदेतील यजमान म्हणून पाहुणे व्लादिमीर पुतिन यांची इतर राष्ट्रप्रमुख आणि मान्यवरांशी ओळख करून देताना दिसत आहेत. या रांगेतच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हेदेखील उभे असल्याचे दिसत आहे. शी जिनपिंग यांनी शरीफ यांच्याआधी उभ्या असलेल्या काही व्यक्तींशी पुतिन यांची ओळख करून दिली; पण शाहबाज शरीफ यांच्यासमोर येताच ते अभिवादन आटोपतं घेऊन पुढे निघाले. इतकंच नाही, तर शरीफ हे अभिवादन करण्यासाठी पुढे असताना जिनपिंग यांनी त्यांच्याकडे कानाडोळा केल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. या व्हिडीओवरून पाकिस्तानमधील नागरिक त्यांचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना ट्रोल करीत आहेत.
हेही वाचा : एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंना काय आश्वासन दिलं होतं? वाशीमध्ये काय घडलं होतं?
राहुल गांधी यांनी भाजपाला पुन्हा केलं लक्ष्य
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कथित मतचोरीच्या मुद्द्यावरून भाजपासह निवडणूक आयोगाला पुन्हा लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्र व हरियाणा या दोन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतचोरी करून भाजपानं निवडणुका जिंकल्या आहेत. या दोन राज्यांमध्ये मतचोरी कशी केली गेली हे काँग्रेसकडून लवकरच उघड केलं जाईल, असा इशारा त्यांनी बिहारच्या आरा येथील जाहीर सभेतून दिला आहे. राहुल गांधींनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा दावा केला होता. मात्र, त्यांनी त्या संदर्भात पुरावे सादर केलेले नाहीत. गेल्या महिन्यात मात्र त्यांनी दिल्लीमधील जाहीर पत्रकार परिषदेत कर्नाटकमध्ये भाजपानें मतचोरी केल्याचे पुरावे दाखवले होते.
मराठा आंदोलकांना उच्च न्यायालयाने काय निर्देश दिले?
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना उच्च न्यायालयानं फटकारलं आहे. जरांगे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन शांततेत झालं नाही. तसेच त्यांनी परवानगी दिलेल्या सर्व अटींचं उल्लंघन केलं, असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मराठा आंदोलनामुळे संपूर्ण शहर ठप्प झालं असून दक्षिण मुंबईतील प्रमुख ठिकाणं आंदोलकांनी वेढली आहेत,. त्यामुळे उद्या (मंगळवारी) दुपारी ४ वाजेपर्यंत आंदोलकांना हटवून मुंबईतील रस्ते मोकळे करा, तसेच आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन होणार नाही, याची खबरदारी सरकारनं घ्यावी, असं न्यायालयानं म्हटलं आहे.