विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. गुजरातच्या राजकारणात काही ठिकाणी चढउतार तर काही ठिकाणी नवी समीकरणे जुळताना पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी नेत्यांनी त्यांच्या भूमिकेपासून घेतलेले यू-टर्न गुजरातमधील लोकांना धक्के देत आहेत. असाच काहीसा धक्का गुजरातमधील भारतीय आदिवासी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार महेश वसावा यांनी दिला आहे. महेश वसावा हे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासोबत एका कार्यक्रमात स्टेजवर उपस्थित होते. स्टेजवर या दोघांमधील मौत्रीपूर्ण संबंध बघून लोकांना धक्का बसला आहे.
कार्यक्रमातील उपस्थितीचे फलित
महेश वसावा हे डेडियापाडा या मतदार संघाचे आमदार आहेत. वसावा हे आदिवासी भागात गुजरात सरकार विरोधात सुरू असलेल्या मोहिमेचे नेते आहेत. महत्त्वाचे म्हणजे सध्या ते अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षासोबत युती करण्यासाठी चर्चा करत आहेत. नर्मदा जिल्ह्यातील डेडिपाडा या माझ्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता. मी या भागाचा आमदार आहे आणि हा सरकारी कार्यक्रम होता म्हणून मला या कार्यक्रमाला उपस्थित रहावे लागल्याचे वसावा यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात मी मुख्यमंत्री पटेल यांना आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न सांगितले. ते त्यांनी शांतपणे ऐकून घेतले आणि ते सोडवण्याचे आश्वासन दिले. हेच या कार्यक्रमातील उपस्थितीचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले.
अरविंद केजरीवाल यांच्यासोबत वसावा यांनी एक मोर्चा काढला होता. मोर्चात त्यांनी एक निवेदन जाहीर केले होते. या निवेदनात त्यांनी “भाजपा सरकार सर्व आदिवासींना नक्षलवादी म्हणून चित्रित करत असल्याचा आरोप केला होता. आम्ही विस्थापित नसून या वनजमिनींचे मुळ मालक आहोत. असे असुनही ते आम्हाला अतिक्रमण करणारे म्हणून संबोधतात. भाजपामुळे आदिवासी भागातील ६००० हून अधिक शाळा बंद झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. नुकत्याच झालेल्या डेडिायापाडा येथील कार्यक्रमात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणले की ” गुजरातमध्ये आदिवासी लोकांचा किती विकास झाला आहे हे पाहायचे असेल तर तुम्हाला थोडे मागे वळून पाहावे लागेल. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावरच ख-या अर्थाने आदिवासी समाजाची प्रगती झाली आहे.
लोकांमध्ये गोंधळ
महेश वसावा यांचा भारतीय आदिवासी पक्ष गुजरातमध्ये ‘आप’सोबत युती करण्याच्या तयारी करत आहे. ‘इंडियन एक्स्प्रेसशी’ बोलताना ‘आप’ च्या एका जेष्ठ नेत्याने सांगितले की “वसावा हे भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे आम्ही गोंधळून गेलो आहोत. या कार्यक्रमाला वसावा उपस्थित राहिल्यामुळे लोकांना आश्चर्य वाटले आहे की त्यांचा पक्ष सरकारविरोधात आक्रमकपणे आंदोलन करत असताना वसावा हे या कार्यक्रमाला का उपस्थित राहिले?”