आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधक इंडिया आघाडीच्या रुपात एकत्र आले आहेत. या आघाडीत एकूण २८ घटकपक्षांचा समावेश आहे. मात्र हे पक्ष एकत्र आले असले तरी यातील  काही पक्षांचे नेते एकमेकांवर उघड टीका करताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये अशाच प्रकारचा संघर्ष सुरू आहे. समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय हे दोन्ही नेते एकमेकांवर सडकून टीका करत आहेत.

अजय राय यांची चिरकूटम्हणत निर्भर्त्सना

समाजवादी पार्टीला मध्य प्रदेशमध्ये जनाधार नाही. त्यामुळे या पक्षाने स्वत:चे उमेदवार उभे न करता काँग्रेसला पाठिंबा द्यावा, असे आवाहन अजय राय यांनी केले होते. मात्र अखिलेश यादव यांनी अजय राय यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला. त्यांनी अजय राय यांची ‘चिरकूट’ म्हणत निर्भर्त्सना केली. याच कारणामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. अखिलेश यादव यांच्या या टीकेला अजय राय यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. मी आतापर्यंत अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर उघडपणे टीका केली आहे. अखिलेश यादव यांनी आतापर्यंत या नेत्यांवर एकदातरी टीका केली आहे का? अखिलेश यादव यांच्या याच स्वभावामुळे त्यांना अनेक लोक सोडून जात आहेत. काही कार्यकर्ते, नेत्यांनी तर आमच्या पक्षात प्रवेशही केला आहे, असे अजय राय म्हणाले. ते ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलत होते.

“आमच्या एकाही नेत्याने अशा प्रकारची भाषा वापरलेली नाही”

“या वादाला आम्ही सुरुवात केलेली नाही. आम्ही नेहमीच शिष्टाचार जपलेले आहेत. याआधी आमच्या एकाही नेत्याने अशा प्रकारची भाषा वापरलेली नाही. अशी भाषा वापरायला अखिलेश यादव यांनाच आवडते. २०१७ साली अखिलेश यादव त्यांच्या पित्यांशी कसे वागले होते, हे संपूर्ण देशाने पाहिलेले आहे. मुलायमसिंह यादव यांचा संपूर्ण भारतात सन्मान केला जायचा. एवढ्या मोठ्या नेत्याशी कोणी अशा प्रकारे कसे वागू शकेल? अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांच्यावही अशाच प्रकारची टीका केली होती. अखिलेश यादव हे ब्रिजेश पाठक यांना नोकर म्हणाले होते. राजकारणाच्या लढाईत प्रत्येकजण शिष्टाचार पाळतो. अखिलेश यादव मात्र ते पाळत नाहीत,” अशी टिप्पणी अजय राय यांनी केली.

“अखिलेश यादव हे अशिक्षित नाहीत”

“अखिलेश यादव यांच्या पार्टीतील अन्य नेते आणि कार्यकर्त्यांनाही त्यांच्या वागणुकीमुळे अपमानास्पद वाटत असावे, असे मी म्हणालो होतो. त्यांच्या पक्षातील काही लोक आमच्या संपर्कात आहेत, त्यांनी दिलेल्या माहितीनुसारच मी हे विधान केले होते. यातील काही नेते तर आमच्या पक्षात आलेले आहेत. अखिलेश यादव हे अशिक्षित नाहीत. ऑस्ट्रेलियात सैनिकी शाळेत शिकल्याचा ते दावा करतात. त्या शाळेत त्यांना अशाच प्रकारची शिकवण मिळाली होती का?” असा सवालही अजय राय यांनी उपस्थित केला.

“आमचे संस्कार हेच आमचे धन”

“समाजवादी पार्टीशी युती करण्याचा निर्णय आमच्या हायकमांडने घेतलेला आहे. पण सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, आमचे संस्कार हेच आमचे धन आहे आणि आम्ही या संस्कारांचा आदर करतो. अजूनही आमच्या पक्षातील एकाही नेत्याने अखिलेश यादव यांच्याप्रमाणे भाषा वापरलेली नाही,” असेही अजय राय म्हणाले.

“मी भूतकाळात काय-काय केलेले आहे, हे एकदा पाहावे”

“अखिलेश यादव यांनी माझ्या उंचीबद्दल बोलण्याआधी माझा इतिहास जाणून घ्यावा. मी भूतकाळात काय-काय केलेले आहे, हे एकदा पाहावे. मी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत सर्वांत तरुण आमदार होतो. मी आतापर्यंत पाच वेळा निवडून आलेलो आहे. पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला (नरेंद्र मोदी) यांना आव्हान देण्याचे मी दोनदा धाडस केलेले आहे,” असे अजय राय यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“याच वाईट स्वभावामुळे त्यांना अनेकजण सोडून जात आहेत”

नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान देण्याची माझ्यात हिंमत आहे. अखिलेश यादव तसे करू शकतात का? त्यांनी आपल्या भाषणात एकदातरी अमित शाह, नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केलेला आहे का? त्यांनी माझ्यावर टीका करताना चिरकूट या असंसदीय शब्दाचा वापर केला. त्यांच्या याच वाईट स्वभावामुळे त्यांना अनेकजण सोडून जात आहेत. याआधीच अनेकांनी त्यांची साथ सोडलेली आहे, असा टोलाही अजय राय यांनी लगावला.