नरेंद्र मोदी हे देवाचे अवतार आहेत, त्यांना वाटेल तोपर्यंत ते पंतप्रधानपदी राहू शकतात, असे वक्तव्य उत्तर प्रदेशच्या राज्यमंत्री गुलाब देवी यांना केले आहे. संभलमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांना माध्यमांनी देशाला दलित पंतप्रधान मिळेल का? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी हे विधान केले आहे. त्यांच्या या विधानावरून वाद पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान समाजवादी पक्षानेही त्यांच्या या विधानावरून पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आहे.

हेही वाचा – गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाची ‘घर वापसी’, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

नेमकं काय म्हणाल्या गुलाब देवी?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचे अवतार आहेत, त्यांना वाटेल तोपर्यंत ते पंतप्रधानपदी राहू शकतात. जेव्हा कोणाला पाण्याची आवश्यकता असते, तेव्हा त्यांना पाणी मिळतं, जेव्हा एखाद्या गरीबाला घर हवं असते, तेव्हा त्यांना घर मिळतं. ज्यांना गॅस कनेक्शन हवं असतं, तेव्हा त्यांना गॅस कनेक्शन मिळतं. मोदींच्या इच्छेनुसारच सर्व घटना होतात. त्यामुळेच ते देवाचे अवतार आहेत”, असे वक्तव्य गुलाब देवी यांनी केले.

समाजवादी पक्षाचा पंतप्रधान मोदींना टोला

गुलाब देवी यांच्या विधानावरून समाजवादी पक्षाचे खासदार शफीकर रहमान बर्क यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. “पंतप्रधान मोदी जर देवाचे अवतात असतील तर ते राजकारणात काय करत आहेत? मोदींनी आता राजीनामा द्यावा आणि लोकांनी त्याची पुजा करावी”, असा टोला त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे. तसेच गुलाब देवी यांनी मूर्खपणाची मर्यादा ओलांडली असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा – गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी; लिंग गुणोत्तर, साक्षरतेची काय स्थिती?

भाजपाची काय प्रतिक्रिया?

दरम्यान, गुलाबदेवी यांच्या विधानाचे भाजपाने समर्थन केले आहे. “आपण ज्यांचा आदर करतो, त्यांची देवाप्रमाणे पुजा करतो. आपण जसं जनता जनार्दन म्हणतो त्याच प्रमाणे गुलाब देवी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत”, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहेत गुलाब देवी?

६७ वर्षीय गुलाब देवी या उत्तर प्रदेश सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. तसेच त्या संभल लोकसभा मतदार संघातील चांदौसी विधानसभा मतदार संघाच्या पाच वेळा आमदार राहिल्या आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्या राज्यशास्राच्या प्राध्यापक होत्या.