भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये काही दिवसांपासून वादाची मालिका सुरू आहे. गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशमधील भाजपाच्या मित्रपक्षांनी राजधानी दिल्लीत एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मागासवर्गीय समुदायाचे प्रतिनिधfत्व करणारे अनेक नेते उपस्थित होते. भाजपाच्या नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे त्यांच्या मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता जाट समाजाची स्तुती करणाऱ्या एका गाण्यामुळे भाजपा आणि राष्ट्रीय लोकदल यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

या वादाची सुरुवात १४ सप्टेंबर रोजी पश्चिम उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या श्री दाऊजी महाराज मेळाव्यातील एका संगीत कार्यक्रमातून झाली. राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख व केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्यासाठी हा भाग राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या संगीत कार्यक्रमात गायक अँडी जाट यांनी आरएलडीचे स्फूर्तिगीत म्हणून ओळखले जाणारे गाणे गायला सुरुवात केली. त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या भाजपाच्या काही नेत्यांनी त्यांना कथितपणे मंचावरून खाली उतरण्यास सांगितले. या कार्यक्रमाला हाथरसचे भाजपाचे खासदार अनुप वाल्मीकी हेदेखील उपस्थित होते. त्यांच्या सूचनेनंतरच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गायकाला स्टेजवरून खाली उतरवले, असा आरोप आरएलडीच्या नेत्यांनी केला.

आरएलडी प्रमुखांनी पुन्हा आयोजित केला कार्यक्रम

दरम्यान, ही बातमी लखनऊ येथे एका खासगी कार्यक्रमासाठी गेलेल्या केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या कानावर गेली. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय लोकदलाचे सादाबाद (हाथरस जिल्हा) विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रदीप कुमार सिंह यांनी पक्षाच्या कार्यक्रमात गायकाचा अपमान झाल्याची माहिती चौधरी यांच्यापर्यंत पोहोचवली. या प्रकाराची माहिती मिळताच जयंत चौधरी यांनी त्याच गायकाला त्याच मंचावरून तेच गाणे पुन्हा गाता येईल याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. आपल्या नियोजित वेळापत्रकात बदल करून, ते दिल्लीला जाण्याऐवजी मुसळधार पावसात कारने हाथरसकडे निघाले. त्यापूर्वी चौधरी यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्टही शेअर केली. “लखनऊहून हाथरसकडे निघालोय… आरएलडी आली रे,” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.

आणखी वाचा : किडनी देणाऱ्या मुलीनेच त्यांना केलं अनफाॅलो; लालूंच्या कुटुंबात पुन्हा वाद, कारण काय?

त्याच मंचावर त्याच गायकाने गायले तेच गाणे

दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय लोकदल पक्षाच्या कार्यकर्त्यांमार्फत हरियाणातील गायक अँडी जाटला पुन्हा हाथरसमध्ये येण्याचे निमंत्रण देण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी हे कार्यक्रमाला उपस्थित असतील, असे गायकाला सांगण्यात आले. अखेरीस बुधवारी मंत्री चौधरी यांच्यासह राष्ट्रीय लोक दल पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गायक अँडी जाटने तेच गाणे पुन्हा गायले आणि कार्यक्रमाचा समारोप झाला. चौधरी यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे भाजपाच्या स्थानिक नेत्यांना नरमाईची भूमिका घ्यावी लागली. वेळेच्या मर्यादेमुळेच गायक अँडी जाट यांना गाणे थांबवण्यात सांगण्यात आले होते. त्यात आमची कुठलीही विरोधी भूमिका नव्हती, अशी सारवासारव भाजपा नेत्यांनी मंत्री चौधरी यांच्यासमोर केली.

घडलेल्या प्रकारानंतर जयंत चौधरी काय म्हणाले?

घडलेल्या प्रकारानंतर जयंत चौधरी यांनीही सामंजस्याची भूमिका घेतली आणि जुन्या गोष्टी विसरून आपण पुढे जायला हवे, असा सल्ला भाजपाच्या नेत्यांना दिला. माध्यमांबरोबर संवाद साधतानाही चौधरी यांनी भाजपाशी संबंधित विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. हाथरस हा माझा कार्यक्षेत्रातील परिसर आहे. कोणावरही दबाव टाकण्यासाठी मी इथे आलेलो नाही, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. सूत्रांच्या माहितीनुसार, या कार्यक्रमात वाद होऊ नये म्हणून गायकालादेखील काही सूचना देण्यात आल्या होत्या. जयंत चौधरी यांची कार्यक्रमाला उपस्थिती असल्यामुळेच मी परत इथे आलो, असे गायक अँडी जाट याने माध्यमांना सांगितले. यावेळी त्याने १४ सप्टेंबर रोजी झालेल्या वादावर शांत राहणेच पसंत केले.

आरएलडी-भाजपाच्या युतीत तणाव

‘आरएलडी आयी रे’ हे गाणे २०२२ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गायक अँडी जाटने तयार केले होते. त्यावेळी आरएलडीची समाजवादी पार्टीबरोबर युती होती आणि ते भाजपा व राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधात निवडणूक लढत होते. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आरएलडीने भाजपाबरोबर हातमिळवणी केली. त्यानंतर पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांच्याकडे केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पदाची जबाबदारी देण्यात आली. गायक अँडी जाटचे YouTube वर २.९६ लाख आणि इन्स्टाग्रामवर १.७५ लाख फॉलोअर्स आहेत.

हेही वाचा : Visual Storytelling : महायुती सरकारची चोहोबाजूने कोंडी, कारण काय? राज्यात नेमकं काय घडतंय?

राष्ट्रीय लोकदलाचे प्रवक्ते रोहित अग्रवाल यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, आमच्यासाठी ‘आरएलडी आयी रे’ हे केवळ एक गाणे नसून कार्यकर्त्यांना मिळणारी प्रेरणा आहे. त्यामुळे ही गोष्ट कोणत्याही पक्षाने इतकी हलक्यात घेऊ नये. मंत्री जयंत चौधरी यांनी या गाण्याला सन्मान मिळावा यासाठी थेट स्टेजवर जाऊन आपला मुद्दा मांडला. १४ सप्टेंबरच्या घटनेवर ते म्हणाले, “गायकाला स्टेजवरून खाली उतरण्यास भाग पाडणे ही चांगली गोष्ट नव्हती. पण, या प्रकारामुळे भाजपा आणि आरएलडीमध्ये कोणताही वाद नाही. आमची युती मजबूत आहे.”

भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षातील संबंधात कटुता?

उत्तर प्रदेशमध्ये २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र, त्याआधी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांमधील संबंधात कटुता निर्माण होताना दिसून येत आहे. राजधानी दिल्लीत मागासवर्गीय समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांच्या बैठकीकडे भाजपा नेत्यांनी पाठ फिरवली होती. त्यावरूनही मित्रपक्षांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती. जयंत चौधरी यांनी यापूर्वीही उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयांवर मतभेद असल्यास आपली मते लपवलेली नाहीत. “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाशी मी सहमत असेन, असे नाही. कारण- आम्ही भाजपात नसून त्यांचे मित्रपक्ष आहोत,” असे जयंत चौधरी दी इंडियन एक्स्प्रेसच्या ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात म्हणाले होते.