Arvi Vidhan Sabha Election 2024 : भाजपसाठी सर्वाधिक डोकेदुखीची जागा ठरलेल्या आर्वी मतदारसंघाचा गुंता अखेर सुटला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांचे नाव भाजपच्या आजच्या यादीत झळकले. गत एक महिन्यापासून पक्षांतर्गत चढाओढ विद्यमान आमदार दादाराव केचे व वानखेडे यांच्यात सूरू होती. त्याची अखेर झाली. विद्यमान आमदाराचा पत्ता भाजपने कापत नवी खेळी खेळली आहे.

त्यापूर्वी रविवारी चांगलेच नाट्य रंगले होते. केचे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणारच असा निर्धार व्यक्त केला होता. सोमवारी तो अंमलात पण आणला. आपल्या समर्थक मंडळीसह त्यांनी अर्ज दिला. त्याचवेळी वानखेडे यांचे नाव झळकले. रविवारी केचे यांना घेऊन माजी खासदार रामदास तडस हे नागपूरला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पोहचले. रात्री बैठक झाली. त्यात अनिल जोशी व सुधीर दिवे उपस्थित होते. ती चर्चा समाधानकारक झाल्याचे केचे म्हणाले. तर सुधीर दिवे यांनी स्पष्ट केले की केचे अर्ज भरतील पण ते श्रेष्टीचा निर्णय अंतिम मानतील.

हे ही वाचा… विदर्भातील निवडणूक रिंगणात कोण कोणाचे नातेवाईक ?

आता तिकीट वानखेडे यांना मिळाली तर केचे यांचा अर्ज सादर झाला आहे. त्यामुळे केचे अर्ज कायम ठेवून बंडखोरी करणार की अर्ज मागे घेत तलवार म्यान करीत वानखेडे यांना पाठिंबा देणार, अशी चर्चा होत आहे. केचे यांना रविवारी नागपूरला झालेल्या बैठकीत काही आश्वासन मिळाले का, ही बाब गुपितच आहे. तशी होण्याची शक्यता व्यक्त होते. मात्र वर्षभरापासून सूरू या स्पर्धेत वानखेडे यांनी चकार शब्द काढला नव्हता. स्वतःच्या उमेदवारीबाबत पण काहीच बोलत नव्हते. अभ्यास करीत परीक्षा द्यायचे. पास, नापास याची चिंता करायची नाही. जे होईल त्यास सामोरे जायचे, अशी भूमिका ते घेत.

हे ही वाचा… नवी मुंबईत नाईक विरोधक चक्रव्युहात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज पक्षाने त्यांच्याकडून कौल दिला आहे. आता ते म्हणाले की लोकांचा निर्णय व्हायचा आहे. मात्र त्या परीक्षेत पण मी उत्तीर्ण होणार, असा विश्वास वानखेडे यांनी व्यक्त केला. महायुतीत जिल्ह्यातील चारही जागा भाजप लढणार आहे. वर्ध्यातून डॉ. पंकज भोयर व हिंगणघाट येथून समीर कुणावार हे विद्यमान आमदार तर देवळीतून राजेश बकाने यांची नावे पूर्वीच जाहिर झालीत. आज वानखेडे यांचे नाव अखेर जाहिर झाल्याने भाजप यादी पूर्ण झाली आहे.