लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात दुर्मीळ होत असलेल्या वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर देण्याचे निर्देश देत पाणमांजर (ऑटर), गिधाड, रानम्हैस यांच्या प्रजनन केंद्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत सोमवारी मान्यता दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम राज्यात सर्व महापालिका, नगरपालिका, शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रभावीपणे राबविण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातील सदस्याला वनमजूर म्हणून सामावून घेण्याचा निर्णयही शिंदे यांनी घेतला. सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यातून लाभ देण्याचे तसेच सर्पदंशावर तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी फिरता दवाखाना (क्लिनिक ऑन व्हील) उपक्रम सुरू करण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले. शिंदे यांच्या ‘ वर्षा ’ निवासस्थानी झालेल्या वन्य जीव मंडळाच्या बैठकीस मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंडळाचे सदस्य आमदार आशीष जयस्वाल, संदीप धुर्वे, ‘मित्र’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल व विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक महीप गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पेंच येथे पाणमांजर, नाशिक येथे गिधाड आणि गडचिरोली येथे रानम्हैस प्रजनन केंद्र उभारण्याविषयी चर्चा झाली. दुर्मीळ होत चालेल्या वन्यजीवांच्या संवर्धनासाठी ही केंद्रे उपयुक्त ठरतील, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. मनुष्य आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याला वन विभागात वन मजूर म्हणून सामावून घेण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. गावांमध्ये वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी होते, त्याला तात्काळ प्रतिसाद म्हणून पथक नेमतानाच वनपाटील यांची देखील नियुक्ती केली जावी, याबाबत याबैठकीत चर्चा झाली.