Jagan Mohan Reddy and sister property dispute आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि त्यांची बहीण वाय. एस. शर्मिला यांच्यात कोट्यवधींच्या मालमत्ता हस्तांतरणावरून वाद सुरू आहे. या प्रकरणात जगन मोहन रेड्डी यांनी आपल्या बहिणीवर फसवणुकीचे आरोप केले आहेत. याच प्रकरणावर मंगळवारी (२९ जुलै) राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (एनसीएलटी) हैदराबाद खंडपीठाने वायएसआर काँग्रेस पक्षाचे (वायएसआरसीपी) प्रमुख वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यांना न्यायालयाने त्यांची आणि पत्नी वाय. एस. भारती यांची सरस्वती पॉवर अँड इंडस्ट्रीजमधील शेअर होल्डिंग त्यांच्या बहीण वाय. एस. शर्मिला आणि आई वाय. एस. विजयलक्ष्मी यांना हस्तांतरित न करण्याची परवानगी दिली. या आदेशाचा या भावंडांवर काय परिणाम होणार? मुख्य म्हणजे या निर्णयाचा राज्याच्या राजकीय परिस्थितीवर परिणाम होईल का? नेमकं हे प्रकरण काय? जाणून घेऊयात.
‘एनसीएलटी’ने आपल्या आदेशात काय म्हटले?
न्यायिक सदस्य राजीव भारद्वाज आणि संजय पुरी यांचा समावेश असलेल्या एनसीएलटी खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की, अपेक्षित असणारे शेअर होल्डिंगचे हस्तांतरण कधीही झाले नव्हते. त्यांनी आदेशात म्हटले आहे, “जरी भेटपत्रे (गिफ्ट डीड्स) औपचारिकपणे तयार केलेली दिसत असली तरी शेअरच्या हस्तांतरणासाठी आवश्यक असलेली मूळ शेअर प्रमाणपत्रे (ओरिजनल शेअर सर्टिफिकेट्स) दानकर्त्याने न दिल्याने कायद्यानुसार हे हस्तांतरण कधीही पूर्ण झाले नाही, त्यामुळे कंपनीला कथित हस्तांतरितांच्या नावावर शेअर्सची कायदेशीर नोंदणी करण्यापासून रोखण्यात आले.”
जगन मोहन रेड्डी यांची याचिका काय होती?
- गेल्या वर्षी ३ सप्टेंबर रोजी जगन मोहन रेड्डी यांनी शेअर्सचे हस्तांतरण अवैध असल्याचा दावा करत ते रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.
- ही याचिका आंध्र प्रदेशातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका झाल्यानंतर काही महिन्यांनी दाखल करण्यात आली.
- या निवडणुकीत वायएसआरसीपीचा प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस होता, ज्याचे नेतृत्व राज्यात शर्मिला करत आहेत.
- प्रचारादरम्यान जगन मोहन रेड्डी यांनी आपल्या बहिणीवरील टीका करणे कायम ठेवले होते, तर शर्मिला यांनीही संपूर्ण प्रचार मोहिमेत त्यांचा भाऊ जगन मोहन रेड्डी यांच्यावर राजकीय आणि वैयक्तिक टीका केली.

निवडणुकीत वायएसआरसीपीचा दारुण पराभव झाल्यानंतर, जगन यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये आपल्या बहिणीला पत्र लिहिले होते. या याचिकेनुसार, सरस्वती पॉवर अँड इंडस्ट्रीजमध्ये जगन यांच्याकडे ७४.२६ लाख (२९.८८ टक्के), भारती यांच्याकडे ४१ लाख (१६.३ टक्के) आणि जगन व शर्मिला यांची आई विजयलक्ष्मी यांच्याकडे १.२२ कोटी (४८.९९ टक्के) शेअर्स आहेत; तर उर्वरित शेअर्स क्लासिक रियल्टी प्रा. लि.कडे आहेत.
जगन मोहन रेड्डी यांचा पक्ष वायएसआरसीपीने दावा केला की, हे शेअर्स वारसा हक्काने मिळालेले नाहीत आणि त्यांनी हे प्रेमापोटी आपल्या आईला दिले. जगन यांनी असाही युक्तिवाद केला की, त्यांच्या बहिणीला माहीत होते की, न्यायालयाद्वारे जप्त केलेली मालमत्ता त्यांच्यावरील प्रकरणे निकाली निघेपर्यंत हस्तांतरित केली जाऊ शकत नाही, तरीही तिने ते स्वतःच्या नावावर बेकायदापणे हस्तांतरित केले. “दुसरा कोणताही पर्याय नसल्याने जगन यांनी एनसीएलटीमध्ये धाव घेतली,” असा दावा वायएसआरसीपीने केला.
जगन मोहन रेड्डी यांनी त्यांच्या याचिकेत जगन यांचे ७४.२६ लाख आणि त्यांच्या पत्नीचे ४०.५ लाख शेअर्स त्यांची आई विजयलक्ष्मी यांना हस्तांतरित करणे रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच त्यांनी क्लासिक रियल्टी प्रायव्हेट लिमिटेडकडून सरस्वती पॉवरच्या माजी संचालकांना १२ लाख शेअर्स हस्तांतरित करणे रद्द करण्याची मागणीही केली होती. त्यासह कंपनीच्या नोंदणीमध्येही दुरुस्तीची मागणी केली होती.
जगन मोहन रेड्डी यांनी आपल्या बहिणीवर काय आरोप केले?
जगन यांनी म्हटले की, ३१ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांनी आणि शर्मिला यांनी एक सामंजस्य करार (MoU) केला होता; त्यामध्ये त्यांनी आपले आणि भारती यांचे शेअर होल्डिंग भेटपत्राद्वारे आपल्या आईला हस्तांतरित करण्यास सहमती दर्शविली होती. जगन यांनी हा निर्णय केवळ प्रेम आणि आपुलकीपोटी घेतल्याचा दावा केला होता.
या सामंजस्य करारात असेही मान्य करण्यात आले होते की, त्यांच्याशी संबंधित प्रकरणांचा निपटारा होईपर्यंत हे हस्तांतरण केले जाणार नाही. त्यांच्यावरील काही प्रकरणांची चौकशी सध्या सक्तवसुली संचालनालय (ईडी) करत आहे. जगन यांच्या म्हणण्यानुसार, १६ जुलै रोजी त्यांना धक्का बसला, कारण सरस्वती पॉवरच्या मंडळाने ६ जुलै रोजी त्यांचे आणि पत्नी भारती यांचे संपूर्ण शेअर होल्डिंग विजयलक्ष्मी यांना हस्तांतरित केले होते.
शर्मिला यांची प्रतिक्रिया काय?
शर्मिला यांनी म्हटले आहे की, त्या एनसीएलटीच्या आदेशाला आव्हान देतील. त्यांनी जगन यांच्यावर कौटुंबिक मालमत्तेतील त्यांच्या वाट्यापासून त्यांना वंचित ठेवण्याचाही आरोप केला आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, जगन यांनी यापूर्वीच आपल्या आईला भेटपत्र दिले होते, त्याद्वारे त्यांनी सर्व शेअर्स तिला हस्तांतरित केले होते. आता जगन यांना शंका आहे की विजयलक्ष्मी हे शेअर्स शर्मिला यांना हस्तांतरित करू शकते, असे त्या म्हणाल्या. भेटपत्राला नाकारून शेअर्स परत मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शर्मिला यांनी जगन मोहन रेड्डी यांच्यावर केला. या आदेशामुळे भावंडांमधील दुरावा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या आदेशामुळे विजयलक्ष्मी यांनाही शेअर्सचे हस्तांतरण थांबवण्यात आले असल्याने, जगन आणि त्यांच्या आईतील दुरावा आणखी वाढण्याची शक्यता आहे.