लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० लोकसभा मतदारसंघ जिंकून मोठा विजय प्राप्त केला होता. महाविकास आघाडीचे नेते या विजयानंतर विधानसभेतही आम्हीच विजय प्राप्त करू असे सांगत होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या तीन महिन्याआधी पुरंदर येथे जाहीर सभेत म्हटले की, राज्यातील सरकार बदलणार आहे. निवडणुकीपूर्वी तीन महिने ८४ वर्षीय राजकारणी असलेल्या शरद पवारांनी आघाडीबरोबर महाराष्ट्र पिंजून काढत वातावरण निर्मिती केली. विशेष करून त्यांनी पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्यासाठी त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात नव्या दमाच्या नेत्यांना उतरविले.

शरद पवारांनी ताकद लावूनही आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांना लोकांमधून नसलेला पाठिंबा तसेच मराठा आरक्षणाच्या विरोधात असलेल्यांच्या मतांची बेरीज, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष हा तळाला राहिला. सहा मुख्य पक्षांच्या स्पर्धेत राष्ट्रवादीने ८६ पैकी फक्त १० जागा मिळविल्या. निकालाच्या आदल्या दिवशी शरद पवार यांनी मविआला १५७ ते १६२ जागा मिळतील, असे सांगितले होते.

राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढाईत कुणाची बाजी?

महाराष्ट्रातील एकूण ३६ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना झाला होता. त्यापैकी २९ जागांवर अजित पवार गटाचा विजय झाला, तर शरद पवारांचा सात जागांवर विजय झाला. अजित पवार गटाने ५९ जागांवर निवडणूक लढविली आणि ४१ ठिकाणी विजय मिळविला. माझी लाडकी बहीण योजना आणि इतर कल्याणकारी योजनांच्या बळावर अजित पवार गटाला चांगले यश मिळाले. तसेच मराठा समाजाच्या विरोधात एकवटलेल्या समाजाने शरद पवार गटाच्या विरोधात मतदान केले, तर अजित पवार महायुतीत असल्यामुळे याचा त्यांना फटका बसला.

हे वाचा >> लाभार्थीकरण, धर्माची फोडणी आणि चमचमीत यश; गिरीश कुबेर यांनी सांगितली महायुतीच्या विजयाची ‘रेसिपी’!

शरद पवार यांच्या सहकाऱ्याने द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, ही पहिलीच वेळ असेल जेव्हा शरद पवारांनी निकालानंतर माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिलेली नाही. कदाचित विधानसभेच्या निकालामुळे शरद पवार गटाला धक्का बसला असावा; तर द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना अजित पवार यांनी शरद पवारांच्या निकालावर भाष्य करण्यास नकार दिला. दोन राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात का? या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की, सध्या मला माझ्या काही विषयांवर काम करायचे आहे. पक्षांतर्गत विषय सोडविल्यानंतर यावर चर्चा करू, त्यानंतर इतर विषयांकडे मी वळेन.

विधानसभेच्या निकालातून मोठी निराशा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने कुणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या पराभवातून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुन्हा एकदा कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले, “विधानसभेत आता आमचे अस्तित्व शून्य असणार आहे. लोकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही.”

तसेच शरद पवार पुढे काय करणार? हादेखील एक मोठा प्रश्न आहे. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांची ही शेवटची निवडणूक असल्याचे म्हटले होते.

विधानसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे थट्टा-मस्करी करताना म्हणाले की, महाराष्ट्रातील लोकांनी आता खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता आहे, हे दाखवून दिले आहे; तर अजित पवारांनी तात्काळ प्रत्युत्तर देत म्हटले की, खरी शिवसेना कोणती आहे, हेही लोकांनी दाखवून दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकारणाचा आमच्या कुटुंबावर काहीही परिणाम होत नाही, असे पवार कुटुंबीय जाहीर सांगत असले तरी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधात प्रचार केल्यामुळे ते दुखावले गेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेव्हा याबाबत विचारले तेव्हा ते म्हणाले की, या प्रकारामुळे नक्कीच मला दुःख झाले. मी त्यांना माझ्या आईसमान मानतो, त्या माझ्या विरोधात कधी प्रचार करतील असे वाटले नव्हते, मी यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही.