Who is Kashinath Chaudhary : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला धक्का देत भाजपाने पालघर जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषद सभापती काशिनाथ चौधरी यांना आपल्या पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. विरोधकांनी याच मुद्द्याला हाताशी धरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केल्यानंतर भाजपाने अवघ्या २४ तासांतच आपला निर्णय मागे घेतला. पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र पाठवून हा निर्णय कळवला. या निर्णयामुळे भाजपाच्या नेतृत्वासह कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नेमके कोण आहेत काशिनाथ चौधरी? त्यांच्या पक्षप्रवेशाला भाजपाने अचानक स्थगिती का दिली? त्याविषयीचा हा आढावा…
भाजपाने चौधरींचा पक्षप्रवेश का रोखला?
१६ एप्रिल २०२० रोजी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात संतप्त जमावाने दोन साधूंची हत्या केली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते काशिनाथ चौधरी यांचा सहभाग असल्याचा आरोप करीत भाजपाने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. या घटनेला पाच वर्षांचा कालावधी लोटला असताना भाजपाने त्याच काशिनाथ चौधरी यांना आपल्या पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकरणी विरोधकांनी टीका केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हा पक्षप्रवेश तातडीने रोखण्याचे आदेश स्थानिक नेत्यांना दिले. या राजकीय गदारोळानंतर चौधरी यांनी मंगळवारी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली.
काय म्हणाले काशिनाथ चौधरी?
माझी जाणीवपूर्वक बदनामी केली जात असून त्याचा मला व माझ्या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास होत असल्याचे चौधरी म्हणाले. “मी घटनास्थळी (पालघर हत्याकांडाच्या ठिकाणी) जमावाला आवरण्यासाठी गेलो होतो. मी साधूंना मारहाण करण्याचा किंवा त्यांची हत्या करण्याचा विचारही करू शकत नाही, कारण त्यांच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती मी आधीच तपास यंत्रणांना दिली आहे. तरीदेखील माझी जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. पालघर हत्याकांडाची घटना घडली तेव्हा काशिनाथ चौधरी हे एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. त्यावेळी राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार होते.
आणखी वाचा : भाजपाच्या विजयी लाटेत विरोधी पक्षांचा जनाधार कसा आटला? किती राज्यांत गमावली सत्ता?
कोण आहेत काशिनाथ चौधरी?
काशिनाथ चौधरी हे पालघर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आहेत. त्यांनी डहाणू तालुकाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. २०१४ मध्ये काशिनाथ चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण, या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला होता. एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर चौधरी हे शरद पवार यांच्याबरोबरच होते. मात्र, काही दिवसांपासून त्यांनी पक्षाशी दुरावा ठेवून भाजपासाठी काम सुरू केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौधरी हे भाजपाचे खासदार हेमंत सावरा यांच्याबरोबर विविध कार्यक्रमात दिसून येत आहेत. रविवारी भाजपाच्या नेत्यांनी काशिनाथ चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला होता. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काशिनाथ चौधरी यांना पक्षात घेण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते.
राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आक्षेप काय?
भाजपाच्या या निर्णयावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत टीकेचा भडिमार केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. काशिनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशावरून भाजपाची चोहोबाजूंनी कोंडी झाल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चौधरींना पक्षात घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. भाजपाने आगामी निवडणुकीत तुम्हाला पालघर जिल्हा परिषद अध्यक्षपद देण्याचे आश्वासन दिले होते का? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता चौधरी यांनी नकार दिला. ‘भाजपाच्या नेतृत्वाने मला कोणतेही आश्वासन दिले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी राबवलेल्या योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे असे मला वाटले आणि म्हणूनच मी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता,” असे चौधरी यांनी स्पष्ट केले.
२०२० साली पालघरमध्ये काय घडलं होतं?
२०२० मध्ये पालघरमधल्या गडचिंचले या दुर्गम गावात जमावाने चोर समजून तीन जणांना ठेचून मारल्याची घडली होती. घटनेच्या दोन दिवसांनंतर बाहेर आलेल्या काही व्हिडीओंमुळे राजकीय वाद निर्माण झाला होता. तत्कालीन सरकारने या घटनेची चौकशी सीआयडीकडे दिली होती. ही घटना अफवा पसरल्यामुळे झाल्याचा निष्कर्ष सीआयडीने काढल्याची माहिती तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. या घटनेच्या चौकशीसाठी सीआयडीने ८०८ जणांना ताब्यात घेतले होते; तर अनेकांना अटक झाली होती. या मुद्द्याला हाताशी धरून भाजपाने महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट जनतेशी संवाद साधत यावर भूमिका मांडली होती. ‘पालघरमधील घटना गैरसमजुतीतून झाली आहे. या घटनेत कुठलाही धर्माचा मुद्दा नाही, त्यामुळे कुणीही द्वेष पसरवू नये’, असे ठाकरे म्हणाले होते.
हेही वाचा : एकनाथ शिंदे यांच्या अचानक ‘बहिष्कार अस्त्रा’ मुळे भाजपला धक्का
काशिनाथ चौधरी यांची दोनदा चौकशी
पालघर हत्याकांडाच्या घटनेनंतर भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा आणि सुनील देवधर यांनी काशिनाथ चौधरी यांच्यावर हत्येच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी सीआयडीने नंतर सीबीआयने चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते, परंतु या प्रकरणात त्यांचे नाव आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आले नाही. हे प्रकरण सध्या स्थानिक न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान, विरोधकांच्या आरोपानंतर काशिनाथ चौधरी यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. ‘माझा मुलगा मुंबईतील वसतिगृहात राहतो आणि कालपासून त्याचे मित्र त्याला त्रास देत आहेत. माध्यमांनी मला हत्याकांडातील आरोपी म्हणून दाखवायला सुरुवात केल्यापासून ते त्याला लक्ष्य करत आहेत. राजकारणाचा फटका माझ्या मुलांना का बसावा?’ असा प्रश्न चौधरी यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी भाजपाच्या जुन्या आरोपांवर कोणतेही उत्तर देणे टाळले आहे.
सुनील भुसारा यांनी भाजपाला केलं लक्ष्य
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी आमदार सुनील भुसारा यांनी या वादाला भाजपाचे दबावतंत्र असे संबोधले आहे. ‘भाजपाला २०२४ च्या निवडणुकीत डहाणूची जागा जिंकता आली नाही, त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी या भागात पक्षाचा जनाधार वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाजपाला काशिनाथ चौधरी यांचा राजकीय प्रभाव माहीत आहे आणि त्यामुळेच ते त्यांना पक्षात घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करीत आहे. नैतिकता आणि प्रामाणिकपणा हे भाजपाच्या शब्दकोशात नाहीत आणि म्हणूनच त्यांनी ज्या व्यक्तीवर हत्याकांडाचा आरोप केला, त्याच व्यक्तीला निर्लज्जपणे पक्षात घेतले’, अशी टीकाही भुसारा यांनी केली आहे.
