Who is Noor Wali Mehsud Tehrik-e-Taliban Pakistan : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव काही काळासाठी निवळला असला तरीही दोन्ही देशांतील संघर्षाचे मूळ कारण अद्याप कायम आहे. तेहरान-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेचा कमांडर नूर वली मेहसूद याला ठार करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मागील काही वर्षांत मेहसूदने आपल्या देशात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. भारताच्या कट्टर शत्रूंच्या मनात धडकी भरवणारा हा तालिबानी कमांडर नेमका आहे तरी कोण? त्या संदर्भातील हा आढावा…
दोन दिवसांच्या रक्तरंजित संघर्षानंतर अखेर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये बुधवारी (तारीख १५ ऑक्टोबर) तात्पुरता युद्धविराम झाला. दोन्ही देशांत निर्माण झालेली कटुता कमी करण्यासाठी चर्चेच्या माध्यमातून सकारात्मक तोडगा काढला जाणार असल्याचे पाकिस्तानच्या मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. गेल्या आठवड्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यांच्या माध्यमातून तालिबानी कमांडर नूर वली मेहसूद याला लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानी हवाई दलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात तो ठार झाल्याचा दावाही करण्यात आला. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मेहसूद हा जिवंत असल्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने या दाव्याची हवा निघाली.
कोण आहे नूर वली मेहसूद?
- २६ जून १९७८ रोजी खैबर पख्तुनख्वा परिसरात जन्मलेल्या महसूदने अनेक मदरसांमध्ये शिक्षण घेतले.
- १९९० च्या दशकात त्याने पाकिस्तान सोडले आणि अफगाण तालिबानच्या मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
- २००१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण केल्यानंतर मेहसूदने काही काळासाठी पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला.
- जून २०१८ मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात तेहरान-ए-तालिबान पाकिस्तान संघटनेचा कमांडर मुल्ला फजलुल्लाह ठार झाला.
- मुल्ला फजलुल्लाह मारला गेल्यानंतर मेहसूदने दहशतवादी संघटनेच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती आपल्या हाती घेतली.
- टीटीपीच्या कराचीमधील कारवाया आणि माध्यम विभाग यांसारख्या महत्त्वाच्या विभागांचे त्याने नेतृत्व केले.
- पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईमुळे टीटीपीने आपले तळ काही काळासाठी अफगाणिस्तानमध्ये हलवले होते.
- मेहसूदने प्रतिस्पर्धी गटांना एकत्र आणून टीटीपीला पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि संघटित केल्याचे सांगितले जाते.
- २०२१ मध्ये तालिबान सत्तेवर आल्यापासून या दहशतवादी संघटनेला अफगाणिस्तानात मुक्तपणे वावरण्याची संधी मिळाल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे.
- अफगाणिस्तानला लागून असलेल्या पाकिस्तानच्या वायव्य भागात टीटीपीने शेकडो दहशतवादी हल्ले घडवून आणल्याचा दावा केला जात आहे.
- जुलै २०१९ मध्ये पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तान भागात तैनात असलेल्या पाकिस्तानी लष्करावर मोठा हल्ला झाला होता.
- ऑगस्ट २०१९ मध्येही पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात अनेक पाकिस्तानी सैनिकांना बॉम्ब हल्ल्यातून ठार करण्यात आले होते.
- या दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी तेहरान-ए-तालिबान पाकिस्तान दहशतवादी संघटनेने घेतल्याने पाकिस्तान चवताळून उठला.
- गेल्या दशकात टीटीपीने पाकिस्तानवर १,००० हून अधिक हल्ले केल्याचा दावा पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्राने केला आहे.
- या घटनेचा कमांडर नूर वली मेहसूद हा सध्या पाकिस्तानसाठी सर्वात मोठा धोका असल्याचा दावा डॉनच्या वृत्तात केला आहे.
पाकिस्तानमधील अनेक शहरांवर हल्ले
तेहरान-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने सुरुवातीला पाकिस्तानमधील मशिदी, बाजारपेठा आणि इतर महत्वांच्या आस्थापनांना लक्ष्य केले होते. २०१४ मध्ये इस्लामाबादमधील एका शाळेवर झालेल्या बॉम्बहल्ल्यात १३० हून अधिक लहान मुले मृत्युमुखी पडली होती. मात्र, अशा हल्ल्यांमुळे पाकिस्तानी लोकांच्या मनात तिरस्काराची भावना निर्माण होत असल्याचे लक्षात येताच टीटीपीने आपला मार्ग बदलला. आता ही संघटना पाकिस्तानी लष्कर आणि तेथील पोलिसांना सातत्याने लक्ष्य करीत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जारी केलेल्या एका व्हिडिओत मेहसूदने पाकिस्तानच्या लष्कराला इस्लामविरोधी ठरवले होते. त्याला भारताचा पाठिंबा असल्याचा आरोप पाकिस्ताकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे भारताने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.
मेहसूद जागतिक दहशतवादी म्हणून घोषित
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने २०२२ मध्ये मेहसूदला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. त्याचप्रमाणे, संयुक्त राष्ट्रांनीही महसूदचे नाव निर्बंध यादीत समाविष्ट केले. मेहसूदला लेखनाची आवड असून त्याने आतापर्यंत तीन पुस्तके लिहिली आहेत. त्यामध्ये एका ७०० पानी प्रबंधाचा समावेश आहे. या प्रबंधात टीटीपीच्या विद्रोहाचे मूळ ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरुद्धच्या संघर्षाशी जोडले आहे. २०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या त्याच्या एका पुस्तकात बेनझीर भुट्टो यांच्या हत्येची जबाबदारी टीटीपीने घेतली असल्याचे म्हटले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, महसूद स्वतःला उत्तर-पश्चिम पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील पश्तून समुदायाचा प्रतिनिधी सांगतो. मात्र, प्रत्यक्षात त्याला या समुदायाचा म्हणावा तितका पाठिंबा नाही.
हेही वाचा : Who is Hina Khan : ‘जय श्रीराम’ असा नारा देत संतप्त आंदोलकांना शांत करणाऱ्या हिना खान कोण आहेत?
मेहसदू खरंच मारला गेला आहे का?
गेल्या काही दिवसांत टीडीपी आणि पाकिस्तान सरकारदरम्यान आदिवासी मध्यस्थांच्या माध्यमातून गुप्त चर्चा झाल्याचे समजते. अफगाण सीमेवरील भागात इस्लामी कायद्याची अंमलबजावणी करणे, या भागातून पाकिस्तानी सैन्याने माघार घेणे आणि लढवय्यांना त्या प्रदेशात पुन्हा परतण्याची परवानगी देणे, अशा मागण्या मेहसूदने पाकिस्तान सरकारकडे केल्या आहेत. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी मात्र या मागण्या फेटाळून लावल्याची माहिती आहे. गेल्या आठवड्यात मेहसूद हा हवाई हल्ल्यात मारल्या गेल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला होता. मात्र, या हल्ल्यातून तो बचावला असल्याचा दावा टीटीपीने केला आहे. तज्ज्ञांच्या मते, महसूद जर खरोखर ठार झाला असेल, तर तो टीटीपीसाठी मोठा धक्का असेल. कारण- महसूद हा दक्षिण वझीरिस्तानातील आदिवासी समुदायांशी थेटपणे जोडलेला नेता आहे. त्याच्या मृत्युमुळे टीटीपीच्या संघटनात्मक रचनेवर आणि मनोबलावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.