Ram Nath Kovind RSS event विजयादशमीच्याच दिवशी नागपुरातील मोहिते वाड्यात १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) स्थापना झाली होती. त्यामुळे दरवर्षी विजयादशमीला संघाचे स्वयंसेवक देशभरात पथसंचलनांचे आयोजन करतात. यंदा संघाचा शताब्दी वर्षातील ऐतिहासिक विजयादशमी सोहळा २ ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. संघाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आपल्या शताब्दी विजयादशमी उत्सवाचे प्रमुख पाहुणे असतील, अशी घोषणा केली आहे. नागपूरच्या रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता हा समारंभ होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे या कार्यक्रमात प्रमुख भाषण देतील.

रामनाथ कोविंद यांना आमंत्रित करण्याच्या निर्णयामागील कारण काय?

  • रामनाथ कोविंद हे दलित समाजातून आलेले कै. के. आर. नारायणन यांच्यानंतरचे दुसरे राष्ट्रपती आहेत.
  • सध्या जाती आणि प्रतिनिधित्वाचे प्रश्न राष्ट्रीय चर्चेत महत्त्वाचे ठरत आहेत. अशा वेळी कोविंद यांची मुख्य पाहुणे म्हणून केलेली निवड राजकीय आणि सामाजिक महत्त्व दर्शवते.
  • टीकाकारांकडून संघावर ऐतिहासिकदृष्ट्या ब्राह्मणवादी म्हणून आरोप केला जात असताना गेल्या काही वर्षांत संघाने आपल्या ‘सामाजिक समरसता’ मोहिमेद्वारे सर्वसमावेशकतेची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
रामनाथ कोविंद कै. के. आर. नारायणन यांच्यानंतर दलित समाजातून आलेले दुसरे राष्ट्रपती आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

२०२२ मध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत (ABPS) या मोहिमेची सुरुवात झाली. या मोहिमेद्वारे विशेषतः दलितांना विहिरी, स्मशानभूमी व मंदिरे यांसारख्या सामाजिक संसाधनांपर्यंत पोहोचण्यास येणार्‍या जातीय अडथळ्यांना दूर करण्यावर लक्ष केंद्रित करते. संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी वारंवार भर दिला आहे की, जातीय भेदभावाचे निराकरण करणे ही एक रणनीतिक निवड नसून, हिंदू एकतेच्या संघाच्या दृष्टिकोनाचा तो भाग आहे.

मार्च २०२४ मध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभेमध्ये बोलताना, संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी बहिष्कृत करण्याच्या प्रथा संपवण्याचा संस्थेचा निर्धार अधोरेखित केला. ते rss.org वरील एका निवेदनात म्हणाले, “कोणालाही विहिरी, स्मशानभूमी, मंदिरे किंवा तलावांपर्यंत पोहोचण्यास नकार देणे आपल्या सभ्यताप्रधान संस्कृतीच्या विरोधात आहे. खरे सामाजिक परिवर्तन तेव्हाच होऊ शकते, जेव्हा समाज स्वतः जबाबदारी घेतो.” विजयादशमीचा दिवस हा संघाचा स्थापना दिवस आहे आणि या दिवसाचा वापर संघाकडून सामाजिक सलोख्यासाठी आपली बांधिलकी अधोरेखित करण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ- २०१६ मध्ये, संघाच्या अनेक राज्य युनिट्सनी स्थानिक कार्यक्रमांचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी दलित धर्मगुरूंना आमंत्रित केले होते. कोविंद यांची शताब्दीनिमित्त केली गेलेली निवड या प्रतीकात्मकतेला राष्ट्रीय स्तरावर उंचावते.

जातीय प्रतिनिधित्वावरील वादविवादांच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली असल्याचेही सांगितले जात आहे. काँग्रेसने जातीय जनगणना आणि आरक्षणाच्या कोट्यात वाढ करण्याची मागणी केली आहे. कोविंद हे राजकीय वर्तुळात सर्वत्र आदरणीय व्यक्तिमत्त्व आहेत. कोविंद यांना त्यांच्या शताब्दी उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून संघाने वंचित समुदायांमध्ये आपली पोहोच वाढवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न दर्शविला आहे. परंतु, या निर्णयामागे कोणतेही राजकारण नसल्याचे संघातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

संघाकडून मोठ्या उपक्रमांची घोषणा

संघ आपले शताब्दी वर्ष साजरे करत असताना, ‘सामाजिक समरसता’ दर्शवीत मोठ्या प्रमाणात तळागाळातील उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार देशभरात एक लाखाहून अधिक ‘हिंदू संमेलन’ आणि ‘घर घर संपर्क अभियान’ आयोजित करण्याची योजना आखली जात आहे. या योजनांचा उद्देश विविध हिंदू समुदायांना एकत्र आणणे आणि जातीय असमानतेवर संवाद साधण्यास प्रोत्साहन देणे आहे. या मोहिमेद्वारे दलितांना मंदिराच्या विधींमध्ये समाविष्ट करण्यावर आणि ग्रामीण भारतातील सार्वजनिक सुविधांमध्ये त्यांची पोहोच सुनिश्चित करण्यावरदेखील लक्ष केंद्रित केले गेले आहे. हा अनेक राज्यांमध्ये एक संवेदनशील मुद्दा आहे. संघ कार्यकर्ते असे मानतात की, सामाजिक सलोख्याकडे जाणारी ही चळवळ अनेक दशकांपासून सुरू आहे. कोविंद यांची निवड हे या प्रवासाचे प्रतीक आहे. त्यातून जातींच्या पलीकडे असलेला हिंदू एकतेचा दृष्टिकोन दिसून येतो.