अलिबाग- महाराष्ट्र दिनी रायगड जिल्ह्यात ध्वजावंदन करण्याची जबाबदारी आदिती तटकरे यांना देण्यात आल्यानंतर, शिवसेना आमदारांनी संताप वक्त केला. आदिती तटकरे यांच्या विरोधात शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पहायला मिळाला. गेल्या काही दिवसात सुनील तटकरे यांनी शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात पक्षाची मोर्चे बांधणी सुरु केली होती. त्यामुळे शिवसेना आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली होती. ती या निमित्ताने बाहेर आली.

गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात पक्षसंघटना बांधणीला सुरूवात केली आहे. महाड, कर्जत आणि अलिबाग या तिन्ही मतदारसंघावर तटकरे यांनी लक्ष् केंद्रीत केले आहे. कर्जत मतदारसंघातून शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात बंडखोरी करत निवडणूक लढवणाऱ्या सुधाकर घारे यांना तटकरे यांनी पुन्हा पक्षात घेत सक्रीय करून घेतले. याच मतदारसंघात शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण डामसे यांचाही पक्ष प्रवेश करून घेतला. सुधाकर घारे यांचे राजकीय पुनर्वसन करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली.

भरत गोगावले यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांचा तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून घेतला. भाजपच्या वाटेवर असलेल्या स्नेहल जगताप अचानक राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. येवढ्यावरच न थांबता तटकरे यांनी खासदार म्हणून महाड पोलादपूर मतदारसंघांतील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. स्नेहल जगताप यांना सोबत घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचक इशारा दिला. जनतेची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड दमही दिला.

अलिबाग मतदारसंघातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी तटकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक या बैठकीला उपस्थित होते. उसर येथील गेल कंपनीच्या प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य द्यावे असे निर्देश त्यांनी दिले. अलिबाग थळ येथील आरसीएफ कंपनीचा सिएसआर फंड आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात नेला. मुरुड नगरपालिका हद्दीत शिवसृष्टी मंजूर करून घेतली पद्मदुर्ग किल्ल्याला भेट देऊन विकास कामांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले. अलिबाग विधानसभा मतदारसंघात तटकरेंचा वाढता राजकीय हस्तक्षेप महेंद्र दळवींसाठी अडचणीचा ठरला. अलिबाग मधील कंपन्यांचा सिएसआर निधी श्रीवर्धन मध्ये जाऊ लागल्याने दळवी कमालीचे अस्वस्थ झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या शिवाय वारंवार मागणी करूनही भरत गोगावले यांची पालकमंत्री पदी वर्णी लागत नसल्याने शिवसैनिकांची नाराजी वाढत गेली. अमित शाह यांचा सुतारवाडी दौरा तर, शिवसेना आमदारांच्या जिव्हारी लागला होता. अशातच महाराष्ट्र दिनाचे रायगड जिल्ह्यातील ध्वजवंदन करण्याची जबाबदारी आदिती तटकरे यांना दिल्याने, मानअपमान नाट्य उफाळून आले. प्रजासत्ताक दिनाला आदिती तटकरे यांना ध्वजारोहणाची संधी दिली गेली होती. मग आता भरत गोगावले यांना का दिली नाही असा आक्षेप शिवसेनेनी घेतला. आणि आदिती यांना ध्वजावंदन करण्यापासून रोखण्यासाठी रणनीती आखण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. यामुळे दोन्ही सत्ताधारी पक्षातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे दिसत आहेत.