मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली नापसंती तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुढील आठवड्यात चर्चा केल्यावर निर्णय घेण्याची घेतलेली भूमिका यामुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर गंडांतर येणार की त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेतले जाणार याचीच आता चर्चा सुरू झाली आहे.
विधान परिषद सभागृहाचे कामकाज सुरू असतामा भ्रमणध्वनीवर कोकाटे हे रमी खेळत असल्याच्या चित्रफीती समोर आल्या. त्यावरून विरोधकांनी कोकाटे यांची कोंडी केली आहे. त्यातचट कोकाटे यांनी सरकारला भिकाऱ्याची उपमा दिली. यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. कोकाटे यांच्या हकालपट्टीची मागणीने जोर धरू लागला असता उपमुख्यममंत्री अजित पवार यांनीही एकूणच नाराजीचा सूर लावला. यापूर्वी कोकाटे यांना दोनदा ताकीद दिली होती. आता ही तिसरी वेेळ असे सांगत अजित पवारांनीही कोकाटे यांच्या वर्तनावर नापसंती व्चक्त केली. येत्या सोमवारी मुंबईत परतल्यावर कोकाटे यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून कोकाटे यांच्याबद्दल निर्णय घेतला जाईल, असे अजित पवारांनी गुरुवारी स्पष्ट केले.
काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी असा प्रवास केलेले कोकाटे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यापासूनच वादग्रस्त ठरले आहेत. सरकारी सदनिकेसाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याने कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकी बचावली. पण खोटी कागदपत्रे सादर केल्याचे न्यायालयात सिद्द झाले होते. खोटी कागदपत्रे सादर केलेले कोकाटे मंत्रिमंडळात कसे, असा सवाल केला जातो. खोटी कागदपत्रे सादर करूनही मंत्र्यावर कारवाई नाही, पण सामान्यांवर लगेचच कारवाई होते, असा कोकाटे यांच्याबद्दल आक्षेप घेतला जातो. कोकाटे यांची विधानेही वादग्रस्त ठरली आहेत. कृषिमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा दिली. आता तर सरकारला भिकारी असे संबोधले. पीक विमा योजनेवरूनही त्यांची विधाने वादग्रस्त ठरली होती.
कोकाटे एवढे प्रभावी नेते आहेत का ?
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाने गेल्या विधानसभा निवडणुकीत चांगले यश प्राप्त केले होते. कोकाटे आणि नरहरी झिरवळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. मंत्रिमंडळात आधी संधी न मिळाल्याने छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून भुजबळ आणि कोकाटे यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. सिन्नर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे कोकाटे हे मतदारसंघातील प्रभावी नेते आहेत. पण जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची तेवढी पकड नाही. मतदारसंघाच्या बाहेर जिल्ह्याच्या राजकारणात कोकाटे फारसे सक्रिय नसतात. यामुळेच कोकाटे यांना अजित पवार अभय देणार का, याची चर्चा आहे. कोकाटे यांची मंत्रिमनंडळातून हकालपट्टीची मागणी होत आहे. वास्तविक खोटी कागदपत्रे सादर केल्याचे न्यायालयात सिद्द झाल्याने कोकाटे यांना नैतिकदृष्ट्या मंत्रिमंडळात कायम ठेवणे हेच मुळात चुकीचे होते. मंत्रिमंडळातूुन हकालपट्टी झाली नाही तरी त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेतले जाऊ शकते, असे बोलले जाते.