Azam Khan Release From Jail : समाजवादी पार्टीचे नेते व उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आझम खान यांची मंगळवारी सीतापूर तुरुंगातून सुटका झाली. जवळपास दोन वर्षांच्या तुरुंगवासानंतर ते जामिनावर बाहेर आले. त्यांच्या स्वागतासाठी समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तुरुंगाबाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी आझम खान यांनी कार्यकर्त्यांसह आपल्या समर्थकांचे आभार मानले आणि लवकरच ते जनतेच्या सेवेत हजर होण्याचे आश्वासन दिले. आझम खान हे अखिलेश यादव यांची साथ सोडून मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीची कास धरणार, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यावरही खान यांनी प्रतिक्रिया दिली.

आझम खान यांच्या बहुजन समाज पार्टीतील संभाव्य प्रवेशाबाबत तर्कवितर्क केले जात होते. बसपाचे रसरा मतदारसंघातील एकमेव आमदार उमा शंकर सिंह यांनी खान यांचे पक्षात स्वागत केले जाईल आणि त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला आणखी बळ मिळेल, असे विधान केल्यानंतर या अटकळी सुरू झाल्या होत्या. मात्र, आझम खान यांनी त्यांच्या या विधानावर थेटपणे टिप्पणी करण्यास नकार दिला. “मी समाजवादी पार्टीला सोडचिठ्ठी देणार असल्याचा बातम्या ज्यांनी पसरवल्या तेच याबद्दल स्पष्टीकरण देऊ शकतात. तुरुंगात असताना मला कोणीही भेटायला आले नाही. तसेच मला फोन करण्याची परवानगीदेखील नव्हती. त्यामुळे मी पाच वर्षांपासून पूर्णपणे संपर्काबाहेर होतो,” असे त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी फेटाळले दावे

समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते शिवपाल यादव यांनीही आझम खान हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. “आझम खान यांच्याविषयी पसरवण्यात आलेल्या बातम्या खोट्या आहेत. समाजवादी पार्टी त्यांना नेहमीच मदत करीत आली आहे. त्यांच्यावरचे सर्व खटले खोटे आहेत. खानसाहेब दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही. ते कायम समाजवादी पक्षातच राहतील,” असे शिवपाल यादव यांनी झाशी येथे पीटीआयशी बोलताना सांगितले. आझम खान हे पक्षाचे एकनिष्ठ नेते असून, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय आहेत. लवकरच ते समाजकार्यात कार्यरत होतील, असे पक्षातील एका नेत्याने सांगितले.

आझम खान यांच्या सुटकेनंतर अखिलेश काय म्हणाले?

समाजवादी पार्टीचे मुझफ्फरनगरचे खासदार हरेंद्र मलिक यांनीही खान यांच्या पक्ष सोडण्याच्या बातम्या निराधार असल्याचे म्हटले. “आझम खान हे पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे ते ‘सपा’ सोडून दुसऱ्या कोणत्याही पक्षात जात असल्याच्या सर्व बातम्या बिनबुडाच्या आहेत. दरम्यान, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही आझम खान यांच्या पाठीशी उभे राहताना त्यांच्या भाजपाविरोधातील भूमिकेचे कौतुक केले. “आझम खान आणि समाजवादी कार्यकर्त्यांनी दीर्घकाळ भाजपाविरुद्ध लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्याविरोधातील सर्व खटले खोटे आहेत. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या अनेक भ्रष्ट नेत्यांवरील खटले मागे घेण्यात आले. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे सरकार आल्यानंतर आझम खान यांच्यावरील सर्व खोटे खटले मागे घेतले जातील,” असे अखिलेश यादव म्हणाले.

आझम खान यांच्याविरोधात कोणकोणते खटले?

७५ वर्षीय आझम खान यांना त्यांच्यावरील शेवटच्या प्रलंबित खटल्यात जामीन मिळाला. हा खटला एका बीअर बारच्या मालमत्तेवरील कथित अतिक्रमणाशी संबंधित होता. पोलिसांनी शत्रू मालमत्ता कायद्यांतर्गत त्यांची सुटका थांबवण्याचा प्रयत्न केला होता; परंतु रामपूर न्यायालयाने २० सप्टेंबर रोजी हा निर्णय रद्द केला. २०१९ पासून खान आणि त्यांच्या कुटुंबीयांना जमीन बळकावणे, द्वेषपूर्ण भाषणे, सरकारी कामात अडथळा आणणे आणि गुन्हेगारी धमकी देणे यासह १०० हून अधिक कायदेशीर खटल्यांना सामोरे जावे लागले आहे. या प्रकरणात खान हे दोनदा दोषी ठरल्याने त्यांना आमदारकी आणि मतदानाचा हक्क गमवावा लागला आहे. त्यांचे पुत्र अब्दुल्ला आझम यांचे विधानसभा सदस्यत्व दोनदा रद्द करण्यात आले. त्यांच्या पत्नी ताझीन फातिमा यांनाही तुरुंगवास भोगावा लागला आहे.

azam khan and akhilesh yadav
आझम खान आणि अखिलेश यादव (छायाचित्र पीटीआय)

आझम खान यांचा गड भाजपाच्या ताब्यात

खान यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘मौलाना मोहम्मद अली जौहर विद्यापीठाचीही चौकशी सुरू असून, त्याची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. या आव्हानांमुळे कुटुंबाचे राजकीय स्थान कमकुवत झाल्याचे सांगितले जात आहे. याच कारणामुळे रामपूर विधानसभा पोटनिवडणुकीत ६०% हून अधिक मतदार मुस्लीम असूनही भाजपा उमेदवाराचा ३४,००० हून अधिक मतांनी विजयी झाला होता. दरम्यान, मंगळवारी आझम खान तुरुंगाबाहेर येताच त्यांचे पुत्र अब्दुल्ला आझम आणि अदीब यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर १०० वाहनांच्या ताफ्यातून ते रामपूरकडे रवाना झाले. या ताफ्याने खान यांचा अजूनही असलेला प्रभाव दाखवून दिला.

azam khan news
तुरुंगातून सुटल्यानंतर कारने आपल्या निवास्थानाकडे निघालेले आझम खान (छायाचित्र एएनआय फोटो)

आझम खान समाजवादी पार्टीचा प्रमुख मुस्लीम चेहरा

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ रामपूरच्या राजकारणाचे शिल्पकार ठरलेले आझम खान हे समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. तसेच ते पश्चिम उत्तर प्रदेशात पक्षातील सर्वांत प्रमुख मुस्लीम चेहरा आहेत. तब्बल १० वेळा त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्याशिवाय लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून त्यांनी संसदेतही प्रवेश केला होता. ज्वलंत भाषणे आणि संघटनात्मक कौशल्यामुळे आझम खान समाजवादी पार्टीचे अविभाज्य भाग झालेले आहेत. लखनऊ येथील डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक शशिकांत पांडे म्हणाले, “आझम खान फॅक्टर आजही अस्तित्वात आहे. मुस्लीम मतदारांना एकत्र करण्याची त्यांची क्षमता अतुलनीय आहे. जर समाजवादी पार्टीने त्यांना राजकीय सूडाचा बळी म्हणून सादर केले आणि त्याच वेळी दलित व मागासवर्गीय मुद्द्यांनाही हात घातला, तर आगामी २०२७ निवडणुकीत त्यांना मोठे यश मिळू शकते.”

आझम खान यांच्यासमोर कोणती आव्हाने?

आझम खान यांचे पुत्र अब्दुल्ला आझम यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आल्याने पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत खान यांच्या शिल्लक असलेल्या प्रभावाची कसोटी लागणार आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, आझम खान तुरुंगातून बाहेर आल्याने पश्चिम उत्तर प्रदेशातील निवडणूक समीकरणे पुन्हा एकदा बदलू शकतात. विशेषतः रामपूर, मुरादाबाद, अमरोहा व बिजनौर यांसारख्या मुस्लीमबहुल जिल्ह्यांमध्ये समाजवादी पार्टीची पकड पुन्हा मजबूत होऊ शकते. २०१२ ते २०१७ दरम्यानच्या समाजवादी पार्टीच्या कार्यकाळात खान यांचा या भागावर मोठा प्रभाव होता. त्यामुळेच ते पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते आणि सरकारमधील अनेक महत्त्वाची खाती त्यांच्याकडे देण्यात आली होती. मुलायम सिंह यादव यांची भूमिका कमी झाल्यावर आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे महत्त्व कमी झाले. आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर खान यांची रणनीती काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.