गणेश यादव, लोकसत्ता
पिंपरी : भाजपच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती झाल्यानंतर सात महिन्यांपासून धुमसत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहर भाजपमधील गटबाजीची दखल अखेर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली. जगताप यांच्या निवडीने नाराज झालेल्या माजी नगरसेवकांसह दोन्ही गटांतील पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक घेत समेट घडवून आणला. त्यानंतर दोन्ही गटांनी नाराजीवर पडदा पडल्याचे जाहीर केले खरे; परंतु प्रदेशाध्यक्षांच्या मध्यस्थीनंतर भाजपमधील गटबाजी खरेच थांबणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शहराध्यक्षपदासाठी जगताप आणि माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्यात चुरस होती. काही माजी नगरसेवकांची काटे यांना शहराध्यक्ष करावे अशी मागणी होती. परंतु, पक्षश्रेष्ठींनी जुलै २०२३ मध्ये जगताप यांच्या पारड्यात वजन टाकत त्यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. तेव्हापासून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवकांचा एक गट नाराज होता. हा गट शहराध्यक्षांच्या कार्यक्रमाला जात नव्हता. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यापासून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचीही नाराजी सातत्याने दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांची नाराजी पक्षाला परवडणारी नसल्याचे लक्षात येताच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शहराध्यक्ष जगताप आणि नाराज माजी नगरसेवकांच्या गटाची नुकतीच एकत्रित बैठक घेतली. माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, यशवंत भोसले, मोरेश्वर शेडगे, संदीप कस्पटे, राम वाकडकर, माजी नगरसेविका सुनीता तापकीर, माधुरी कुलकर्णी या सर्व नाराजांना बोलावून घेतले. त्यांची मते जाणून घेतली. शहर, महिला, युवा आणि प्रदेश कार्यकारिणीवर संधी देण्याची मागणी नाराजांनी केली. तसेच प्रभाग स्तरावर ज्यांची ताकत आहे, त्यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याचा शब्द नाराजांनी मागितला. त्यावर बावनकुळे यांनी शहराध्यक्ष जगताप यांच्याशी चर्चा केली. सर्वांना सामावून घ्यावे, शहर कार्यकारिणीत काम करण्याची संधी देण्याची सूचना केली. त्यानंतर माजी नगरसेवकांच्या गटाने नाराजी संपल्याचे जाहीर केले. पूर्ण ताकतीने लोकसभा निवडणुकीसाठी काम करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे नाराजीवर कायमचा पडदा पडणार, की आगामी काळात पुन्हा नाराजीनाट्य रंगणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले, की प्रदेशाध्यक्षांनी आमची बाजू जाणून घेतली. आमच्या गटातील पदाधिकाऱ्यांना कार्यकारिणीवर घेतले जाणार आहे. प्रभागातील ताकतीचा विचार करून उमेदवारी दिली जाणार आहे. शहराध्यक्षांना तशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे आमची नाराजी संपली आहे. पुन्हा एकदा आमची बैठक होणार आहे. शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, की प्रदेशाध्यक्षांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. सर्वांच्या शंका दूर केल्या आहेत. काही पदाधिकाऱ्यांना शहर, प्रदेश कार्यकारिणीत काम करण्याची संधी दिली जाईल. एकजुटीने काम करण्याचा निश्चय सर्वांनी केला आहे.
आणखी वाचा-भाजपचा ‘माधव’ सूत्राबरोबर लिंगायत मतपेढीला आकार देण्यावर भर
दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये शहराची विभागणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यात पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे लोकार्पण, उद्घाटन केले. परंतु, भोसरी मतदारसंघातील कामांचे उद्घाटन केले नाही. भाजप आमदार महेश लांडगे यांच्या आग्रहानुसार भोसरीतील कामांचे उद्घाटन दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे मागील रविवारी नियोजित होते. परंतु, ऐनवेळी फडणवीस यांचा दौरा रद्द झाला. श्रेय घेण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीत चढाओढ असून, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये शहराची विभागणी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.