तडजोड केली तरच युती टिकते आणि बोलघेवड्या नेत्यांनी नाहक बडबड करू नये, असे पररखड मतप्रदर्शन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर तरी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटातील तू तू, मै मै थांबणार का, हाच खरा कळीचा मुद्दा आहे.

महायुतीमध्ये भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट हे तीन मुख्य पक्ष असले तरी शिंदे गट आणि पवार गटात अजिबात मेळ नाही. उलट उभयता परस्परांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. याचे ताजे उदाहरण म्हणजे अर्थसंकल्पात करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे देता येईल. अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला असला तरी लाडकी बहीण योजनेचे सारे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेत असल्याने अजित पवार अस्वस्थ झाले आहेत. कधीही माध्यमांसमोर येण्याचे टाळणाऱ्या अजित पावर यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमात ध्वनिचित्रफीत अर्थसंकल्पीय घोषणांची उजळणी केली. तसेच ‘माझी लाडकी बहीण योजना’ असा दोनदा उल्लेख केला. या योजनेतील मुख्यमंत्री हा शब्द वगळला. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने लावण्यात आलेल्या फलकांवरही मुख्यमंत्री हा शब्द गायब होता. यावरून मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांमध्ये लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यावरून कशी लढाई सुरू आहे हे बघायला मिळाले.

हेही वाचा – मुंबई महानगरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना दुपारच्या सत्रातही सुट्टी, मुंबई महानगरपालिकेचा निर्णय

फडणवीस यांनी बोलघेवड्या प्रवक्त्यांनाही कानपिचक्या दिल्या. अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी हे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नाहीत. लगेचच शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिले जाते. भाजप नेते किंवा प्रवक्त्यांकडून संयम बाळगला जातो. पण शिंदे गट आणि अजित पवार गटाचे नेते परस्परांवर टीका वा आरोप करतात.

हेही वाचा – मुंबई विद्यापीठाच्या ‘आयडॉल’च्या परीक्षा पुढे ढकलल्या, आज होणाऱ्या परीक्षा १३ जुलैला होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीस यांनी कानपिचक्या दिल्या तरीही शिंदे गट व पवार गटाच्या नेत्यांच्या वर्तनात सुधारणा होण्याबाबत साशंकताच आहे. दोन्ही पक्ष परस्परांकडे मित्रापेक्षा स्पर्धक म्हणून बघतात. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला जादा जागा सोडण्यात आल्याबद्दल अजित पवार गटाच्या नेत्यांनी आक्षेप घेतला होता. शिंदे गटाएवढेच राष्ट्रवादीचे आमदार आहेत. विधानसभेच्या वेळी शिंदे गटाला जेवढ्या जागा सोडल्या जातील तेवढ्याच जागा पवार गटाला मिळाव्यात, अशी मागणी छगन भुजबळ व राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी केली आहे. यामुळेच जागावाटपावर जाहीरपणे वाच्यता करू नये, असा सल्ला फडणवीस यांना मित्र पक्षांना द्यावा लागला आहे.