आसाराम लोमटे

परभणी : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी आपण महायुतीसोबतच असल्याचे स्पष्ट केल्यानंतर जानकरांच्या पक्षाला लोकसभेची एक जागा दिली जाईल असे महायुतीच्या नेत्यांनी संयुक्तरित्या स्पष्ट केले. जानकर यांचा मतदारसंघ कोणता असेल याबाबत संभाव्य चर्चा सुरू झाल्या असून माढा की परभणी या पर्यायाच्या दृष्टिकोनातून परभणीचीच चर्चा जास्त सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा मेळावा परभणीत पार पडला होता. या मेळाव्यात जानकर यांनी आपण महायुती व महाविकास आघाडी या दोघांनाही प्रस्ताव दिलेले आहेत असे सांगितले. त्यानुसार माढा किंवा परभणी या दोन पैकी एक जागा आपण लढवणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले होते. जानकर यांचे महाविकास आघाडी सोबत जाण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे माध्यमातून स्पष्ट झाले होते. एवढेच नाही तर खुद्द जानकर यांनीही आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून माढा ही लोकसभेची जागा लढवत असून या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ असेही सांगितले होते. अवघ्या काही तासातच जानकर यांनी आपला पवित्रा बदलला.

आणखी वाचा-शिंदे पुत्राविरुद्ध ठाकरे गटाला उमेदवार आयातीची वेळ ?

जानकर हे माढ्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार होत आहेत असे चित्र निर्माण झाल्यानंतर आज सकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तशी घोषणाही केली होती मात्र दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत जानकर यांचे छायाचित्र झळकले. त्याचबरोबर या सर्व नेत्यांनी संयुक्तरीत्या एक पत्रक काढले. त्यावर महादेव जानकर यांची स्वाक्षरी असून आपण लोकसभेसाठी महायुती सोबत असल्याचे जानकर यांनी जाहीर केले. त्याचबरोबर जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला एक लोकसभेची जागा देण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले.

आणखी वाचा-जालन्यातील मतदारयाद्यांमध्ये तरुण-तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत

महायुतीमार्फत गेल्या काही दिवसांपासून परभणीत उमेदवारीचा घोळ चालू आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर यांच्या नावाची चर्चा चाललेली होती तर भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हेही प्रयत्नशील होते. विटेकरांनी गाठीभेटी सुरू केल्या होत्या तर बोर्डीकरांनीही लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रचार प्रमुख म्हणून बैठकांचा धडाका लावला होता. विशेषतः गेल्या दोन-तीन दिवसात विटेकर की बोर्डीकर ही चर्चा सुरू झाली. त्यातच जानकर यांनी महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना आता महायुतीकडून परभणीची जागा दिली जाईल अशी चर्चा जोर धरत आहे. जानकर यांच्या पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडचे आमदार आहेत. स्थानिक पातळीवर कोणाला उमेदवारी द्यायची असा पेच गेल्या काही दिवसात निर्माण झाला असताना जानकर यांना महायुतीची उमेदवारी मिळाली तर स्थानिक पातळीवरही कोणताच वाद राहणार नाही असा महायुतीच्या नेत्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.