लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून २९ एप्रिलपर्यंत शहरासह जिल्ह्य़ातून बाराशे तक्रारी सी-व्हिजिल अ‍ॅपद्वारे प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींचे निराकरण जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

निवडणूक आचारसंहितेचे योग्यरीतीने पालन होत आहे किंवा कसे याची माहिती घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भरारी पथके नेमली होती. तसेच सी-व्हिजिल अ‍ॅपवरून आलेल्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तळमजल्यावर सी-व्हिजिल कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. निवडणुकीची आचारसंहिता १० मार्च रोजी सायंकाळपासून लागू करण्यात आली. पुणे, बारामतीसाठी २३ एप्रिल, तर मावळ आणि शिरूरसाठी २९ एप्रिल रोजी मतदान झाले. २९ एप्रिलपर्यंत सी-व्हिजिल अ‍ॅपवरून बाराशे तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या.

आलेल्या या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे, अशी माहिती सी-व्हिजिल कक्षाचे समन्वयक सुरेश जाधव यांनी दिली. सर्वाधिक तक्रारी अनधिकृत प्रचारफलक, बोर्ड, फ्लेक्स, होर्डिग यांच्या आहेत. निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता शिथिल होईपर्यंत सी-व्हिजिल नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्य़ातील चारही लोकसभा मतदारसंघांचे मतदान झाल्यानंतर तक्रारी येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे, असेही जाधव यांनी सांगितले.

स्वतंत्र नियंत्रण कक्ष

सी-व्हिजिल अ‍ॅपद्वारे प्राप्त तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापण्यात आला आहे. या कक्षाचे समन्वय अधिकारी सुरेश जाधव यांच्या अंतर्गत सहा नियंत्रण अधिकारी, आठ कर्मचारी अशी पंधरा जणांची नेमणूक करण्यात आली आहे. हा कक्ष चोवीस तास कार्यान्वित होता. एका वेळेला तीन नियंत्रण अधिकारी, एक वरिष्ठ अधिकारी आणि चार कर्मचारी कार्यरत होते.