पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील १२० पोलिसांनी करोनावर मात केली आहे. कौतुकास्पद म्हणजे ९० जण कर्तव्यावर रुजू देखील झाले आहेत. आयुक्तालयातील एकूण १४९ जणांना करोना विषाणूची लागण झाली होती. यातील १२० जण ठणठणीत बरे झाले असून २९ जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त आर.आर.पाटील यांनी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात करोना महामारी उग्र रूप धारण करत आहे. दिवसेंदिवस शहरातील बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना करोना योद्धे म्हणून संबोधले जाणारे पोलीस देखील याला अपवाद ठरू शकले नाहीत. पिंपरी-चिंचवड शहरातील २ हजार ११७ जणांची कोविड टेस्ट करण्यात आली असून,यापैकी  १४९ जण करोनाबाधित असल्याचं समोर आलं होतं. त्यातील १२० पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी करोनावर मात केली असून, ते कर्तव्यावर देखील रुजू झाले आहेत.

सध्या पिंपरी-चिंचवड शहरात करोना बाधितांची संख्या १५ हजार ६३२ वर पोहचली असून, १० हजार १५८ जण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, अनेकांचा करोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. कौतुकास्पद म्हणजे १२० पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे पोलीस दलातील करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेली चिंता काहीशी कमी होत असल्याचे दिसून येत आहे.