पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १५४८ रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ४२ हजार १३६ एवढी झाली आहे. तर दिवसभरात ४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ही माहिती देण्यात आली.

पुण्यात आज अखेर ३ हजार ३७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १५९९ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख २१ हजार १७६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

तर, पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी दिवसभरात ८१२ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून २२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, ९१४ जण आज करोनातून मुक्त झाले त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७६ हजार ७९वर पोहचली असून यांपैकी, ६२ हजार ७१८ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४ हजार ७४५ एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.