करोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनी 14 एप्रिलपर्यंत लॉक डाऊनची घोषणा केलेली आहे. या काळात व पुढे देखील नागरिकांवर कोणत्याही गैर सोयीला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रशासनाकडून देखील सर्वोतोपरी खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील शासकीय धान्य गोदामात 19 हजार 975 मेट्रिक टन धान्यसाठ्याची तसेच मार्केट विभागात 9 हजार 330 क्विंटल अन्नधान्याची व 18 हजार 330 क्विंटल भाजीपाल्याची आवक करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले की, पुणे विभागात येणार्‍या जिल्ह्यांचा विचार करता, प्रत्येक ठिकाणी अन्नधान्य आणि भाजीपाला मिळेल असे नियोजन करण्यात आले आहे. केवळ पुणे जिल्ह्यासाठी 4 हजार 473 मेट्रिक टन धान्यसाठा, तर पुणे जिल्ह्यात 12 हजार 458 क्विंटल भाजीपाला साठा उपलब्ध झाला आहे.

तसेच, पुणे विभागात येणार्‍या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांसाठी 89.14 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.32 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.