निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात एकून दोनशे जणांनी सहभाग नोंदवला होता. दरम्यान, यातील पिंपरी-चिंचवडमधील एकूण ३२ जणांनी सहभाग नोंदवला होता. त्या पैकी १५ जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. उर्वरित व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. हे १० ते १५ जण पिंपरी-चिंचवड शहरातील असल्याची माहिती समोर आली असून त्यांना महानगर पालिकेच्या रुग्णालयात क्वारंटइन करण्यात आलं आहे अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलीस आणि महानगर पालिका प्रशासनाने दिली आहे. पुणे जिल्ह्यात शेकडो जण असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दिल्लीमधील निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातीने धार्मिक कार्यक्रम आयोजित केला होता. यात शेकडो जण विविध शहरातून येऊन सहभागी झाले होते. यात एकाच इमारतीतील २४ जणांना करोनाची बाधा (पॉझिटिव्ह) असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान, सहभागी झालेल्या सहा जणांचा तेलंगणामध्ये मृत्यू झाला आहे. गंभीर बाब म्हणजे धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या पैकी १० ते १५ जण हे पिंपरी-चिंचवड शहरातील आहेत. आज दिवसभर त्यांची नावे शोधून त्यांना पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि भोसरी येथील नूतन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत अशी माहिती महानगर पालिका प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात आणखी शेकडो जण असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.