पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंतचा उच्चांक करोना बाधितांनी गाठला असून शहरातील बाधितांनी तीनशेचा आकडा पार केला आहे. आज दिवसभरात तब्बल ४६ जण करोना बाधित रुग्ण आढळले असून त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील बाधितांची संख्या ३११ वर पोहचली आहे. दरम्यान, यातील काही रुग्ण हे पुण्यातील भवानी पेठ, नाना पेठ, येरवडा आणि खडकी येथील आहेत त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांनी जास्त घाबरण्याची गरज नाही.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत च चालले ला आहे.  आजपर्यंतची उच्चांकी संख्या करोना रुग्णांनी गाठली. पुण्यातील काही ठिकाणाहून आणि शहरातील परिसरातून एकूण ४६ जण बाधित आढळले आहेत. यात २९ पुरुष आणि १७ स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील बाधित रुग्णांची संख्या ही ३११ वर पोहचली आहे तर १६९ जणांना आजपर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज देखील ९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आज बाधित आढळले रुग्ण हे चिंचवड स्टेशन, पिंपरी, वाकड, भोसरी, वडमुखवाडी, पुण्यातील भवानी पेठ, नाना पेठ, येरवडा आणि खडकी येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  तर इंदिरानगर चिंचवड, आकुर्डी, चऱ्होली आणि थेरगाव येथील रहिवासी असलेल्या ९ करोनामुक्त व्यक्तींना घरी सोडण्यात आले आहे.