अपंग साहित्य व सांस्कृतिक परिषद पुणेतर्फे चौथ्या अपंग साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन २२ व २३ फेब्रुवारी रोजी मार्केटयार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालयात होणार आहे, अशी माहिती कार्यवाहक मधुमेह संशोधक डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष व संस्कार ग्रुपचे संस्थापक वैकुंठ कुंभार आदी उपस्थित होते. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी भारत सरकार अपंग कल्याणचे मुख्य आयुक्त प्रसन्ना कुमार पिंचा, महाराष्ट्र अपंग कल्याणचे मुख्य आयुक्त बाजीराव जाधव आदी उपस्थित राहणार आहेत. ग्रंथदिंडी, निमंत्रितांचे कविसंमेलन, तंत्रज्ञानातून अपंगत्वावर मात आणि विविध साहित्य विषयांवर परिसंवाद संमेलनात होणार आहेत. दोन दिवसीय संमेलन समितीच्या स्वनिधीतून होणार असून संमेलनाला ५ हजार अपंग नागरिक येणार आहेत.