गणेशोत्सवानिमित्त मार्केटयार्डातील घाऊक फुलबाजारात फुलांची मोठी आवक झाली. उत्सवाच्या कालावधीत  पुढील दहा दिवस फुलांना मोठी मागणी राहणार असून फुलांचे दर चढे राहणार आहेत. झेंडू, शेवंती, गुलछडी, डच गुलाबांना मागणी चांगली असून या फुलांचे दर दहा ते वीस टक्कय़ांनी वाढले आहेत.

गणेश प्राणप्रतिष्ठापनेसाठी अनेक मंडळांकडून फुलांचे सजावट असलेले रथ तयार केले जातात. घरगुती गणेशोत्सवानिमित्त फुलांना मोठी मागणी असते. उत्सवाच्या कालावधीत हार, फुलांना मागणी चांगली असते. शहराच्या विविध भागातील हार-फुले विक्रेत्यांकडून उत्सवाच्या कालावधीत फुलांना मोठी मागणी असते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गणेशोत्सवात फुलांचे दर वाढले असून  यंदा फुलांचा दर्जा चांगला आहे. खराब मालाचे प्रमाण कमी असल्याने दर चांगले मिळाले आहेत. घरगुती गणपती पाच ते सात दिवसांचे असतात, तसेच गौरी आगमनाच्या दिवशी फुलांना चांगली मागणी असते. किरकोळ फू ल विक्रेते आणि सामान्य नागरिकांकडून उत्सवाच्या कालावधीत फुलांना चांगली मागणी राहणार आहे, अशी फुलबाजारातील प्रमुख विक्रेते सागर भोसले यांनी दिली.

फुलबाजारात गुरुवारी फुलांची मोठी आवक झाली. किरकोळ विक्रेत्यांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. फुलबाजारात शुक्रवारी पहाटेपासून घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या अनेकांनी मोठय़ा प्रमाणावर फुलांची खरेदी केली होती. झेंडी, शेवंती, गुलछडी या फुलांना चांगली मागणी राहिली. झेंडूची आवक सोलापूर, सातारा, गुलछडीची आवक पुणे जिल्ह्य़ातील यवत, सोरतापवाडी येथून होत आहे. कोलकात्ता झेंडूला हारविक्रेत्यांकडून चांगली मागणी राहिली आहे. कोलकात्ता झेंडूचे पीक पुणे, सातारा, सोलापूर भागात मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते, असे भोसले यांनी सांगितले.

शेवंतीची आवक बंगळुरुतून

गणेशोत्सवात शेवंतीला मोठी मागणी असते. पुणे जिल्ह परिसरातील शेवंतीच्या तुलनेत बंगळुरुमधील शेवंतीचा दर्जा चांगला असतो. सध्या बंगळुरु भागातून शेवंतीची फुलबाजारात मोठी आवक झाली. उत्सवाच्या कालावधीत फुलांना मोठी मागणी राहणार आहे. यंदाच्या वर्षी मागील वर्षीपेक्षा फुलांना चांगले दर मिळाले आहेत, अशी माहिती सागर भोसले यांनी दिली.

फुलांचे                     दर (प्रतिकिलो)

शेवंती                        १०० ते ३००

गुलछडी-                   १५० ते ३००

कोलकात्ता झेंडू-          ८० ते ११०

साधा झेंडू-                   ४० ते ६०