वैशिष्टय़पूर्ण प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर
पुणे : सापासारख्या दिसणाऱ्या आणि सापाची मिमिक्री करणाऱ्या पायटोप (मोनोप्टेरस इंडिकस) या माशाविषयीचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागातील संशोधकांनी पुढाकार घेतला आहे. देशी प्रजातीच्या या माशाला इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेने नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे घोषित केले असून ही प्रजाती वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
‘पायटोप हा सापसदृश मासा पश्चिम घाट परिसरात आढळतो. शेतजमीन, चिखल, दमट जागी या माशाचे वास्तव्य असते. स्वतचा बचाव करण्यासाठी तो सापाची नक्कल करतो. आपल्यावर हल्ला होणार असल्याचे जाणवताच तो सापासारखा फणा काढण्याचा प्रयत्न करतो. तसेच चावण्याचाही प्रयत्न करतो. त्याच्याकडे हे कौशल्य कसे आले हा संशोधनाचा विषय आहे. त्याशिवाय या माशाविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. त्याच्या प्रजोत्पादनाचा काळ, प्रजोत्पादनाची पद्धती, त्याची शरीररचना, रक्ताभिसरण या सगळ्याचाच शास्त्रीय अभ्यास करणे आवश्यक आहे. या माशाच्या अभ्यासासाठी आम्ही कोयना, तैलबैला, ताम्हिणी, लोणावळा, आंबोली, राधानगरी या परिसरात भेटी दिल्या,’ अशी माहिती गणेशखिंड येथील मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातील संशोधक चांदनी वर्मा, पंकज गोरुले, मनोज पिसे आणि प्रदीप कुमकर यांनी दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन करण्यात येत आहे.
‘दमट वातावरणात राहणारा हा मासा बाहेरही येऊन राहू शकतो. आतापर्यंत केलेल्या अभ्यासातून हा मासा गाडीखाली येऊन मरण्याचे प्रमाण मोठे असल्याचे आढळून आले आहे. साधारणपणे जून ते जुलै हा त्यांच्या प्रजोत्पादनाचा काळ असावा, असा अंदाज आहे. मात्र, विकास कामांमुळे, शेतीमध्ये रसायनांच्या वापरामुळे त्याच्या अधिवासाला धक्का लागून त्यांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे,’ असेही या शास्त्रज्ञांनी सांगितले.
पायटोप या सापसदृश माशाविषयी माहितीच नसल्याने त्याला साप समजून मारले जाते. ही देशी प्रजाती वाचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यासाठी त्याचा शास्त्रीय अभ्यासही आवश्यक आहे. त्या दृष्टीनेच या माशाविषयीचे संशोधन सुरू केले आहे. सखोल शास्त्रीय संशोधन होण्यासाठी आणखी दोन वर्षे लागतील.
– डॉ. संजय खरात, प्राचार्य, मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, गणेशखिंड
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 12, 2019 4:32 am