पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटातील अंडा पॉईंट येथे खासगी प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले. त्यातील सात जणांची प्रकृती गंभीर आहे. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला.
बोरघाट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव निघाली होती. ब्रेक निकामी झाल्याने बोरघाटातील अंडा पॉईंट येथील वळणावर बस उलटी झाली व पुन्हा सरळ झाली. त्यामुळे आतील काही प्रवाशांना गंभीर इजा झाली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व आयआरबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
अपघातग्रस्त बस बाजूला काढून काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली. द्रुतगती मार्गावर आयआरबी कंपनीच्या वतीने दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 16, 2015 3:18 am