इस्रोची मानाची ‘धवन’ शिष्यवृत्ती पटकावलेल्या आदित्य चाफळकर या पुणेकर तरूणाने पदव्युत्तर पदवीच्या परीक्षेतही उत्तुंग यश मिळवले आहे. या शिष्यवृत्तीवर कॅलिफोर्नियाला ‘एअरोस्पेस’ विषयात पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी गेलेल्या आदित्यने तेथील अंतिम परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. आदित्य सध्या कॅलिफोर्नियात असून काही दिवसांतच तो भारतात परतणार आहे. त्याचे आजोबा बाळकृष्ण चाफळकर यांनी त्याच्या यशाविषयी माहिती दिली.
आदित्यचे शिक्षण पुण्यातील भावे प्रशालेत मराठी माध्यमातून झाले आहे. ‘एअरोस्पेस’ या विषयात पदवी घेतल्यानंतर त्याची ‘इस्रो’च्या (इंडियन स्पेस रीसर्च ऑर्गनायझेशन) ‘धवन’ शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली. ही शिष्यवृत्ती पटकावणारा आदित्य हा पहिलाच विद्यार्थी ठरला. या शिष्यवृत्तीवर त्याने कॅलिफोर्नियातील ‘कॅलटेक युनिव्हर्सिटी’त जाऊन एअरोस्पेस विषयातील नऊ महिन्यांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. नुकताच या अभ्यासक्रमाचा पदवीप्रदान समारंभ झाला असून आता आदित्य परत येऊन इस्रोमध्ये रुजू होणार असल्याचे चाफळकर यांनी सांगितले.