पर्यावरण रक्षणासाठी समाजातील सर्व घटकांनी एक येण्याची गरज आहे, असे मत अभिनेता रणदीप हुड्डा यांनी वाकड येथे बोलताना व्यक्त केले. अन्न, वस्त्र, निवारा या मनुष्याच्या मूलभूत गरजा होत्या. मात्र, ‘ग्लोबल वॉर्मिग’मुळे पर्यावरण ही माणसाची मूलभूत गरज झाली आहे, असेही ते म्हणाले.
पर्यावरण दिनानिमित्त वाकड येथे आयोजित ‘एक व्यक्ती, एक झाड’ या उपक्रमाचे उद्घाटन अभिनेते हुड्डा तसेच अभिनेत्री काजल अग्रवाल यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. आमदार लक्ष्मण जगताप, माजी उपमहापौर अमर मूलचंदाणी, पीसीएमटीचे माजी सभापती सुरेश चोंधे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, संतोष कस्पटे, संदीप कस्पटे, राम वाकडकर, अनिल जाधव आदींसह या वेळी मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.
अभिनेत्री काजल म्हणाली, माणसाच्या गरजा वाढल्या, त्याचा परिणाम पर्यावरणाच्या असंतुलनावर होत आहे. या गरजा कमी करून पर्यावरण संवर्धनावर जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे. जगताप म्हणाले, वाढत्या शहरीकरणामुळे
पर्यावरणाचा ऱ्हास झाला असून त्याचा मानवी जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध सामाजिक उपक्रम तसेच प्रत्यक्ष कृती करण्याची आवश्यकता आहे.