पुणे सार्वजनिक सभा

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा मुख्य प्रेरणास्त्रोत असलेल्या राष्ट्रीय सभेच्या (ज्या राष्ट्रीय सभेचे पुढे काँग्रेस या चळवळीमध्ये रूपांतर झाले) स्थापनेस प्रमुख कारण ठरलेली पुणे सार्वजनिक सभा शनिवारी (१३ एप्रिल) तिथीनुसार दीडशेव्या वर्षांत पदार्पण करत आहे. सार्वजनिक संस्थांचे शहर ,अशी ओळख असलेल्या पुण्यातील सार्वजनिक सभेचे स्वातंत्र्य, समाज सुधारणा, जागृती, लोकशिक्षण आणि राष्ट्रउभारणी या कार्यामध्ये महत्त्वाचे योगदान राहिले आहे. पुण्याचे भूषण असलेल्या पुणे सार्वजनिक सभेचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे केले जाणार आहे. संस्थेच्या दीड शतकांच्या वाटचालीबद्दल पुणे सार्वजनिक सभेचे कार्याध्यक्ष अनिल शिदोरे यांच्याशी साधलेला संवाद

*  पुणे सार्वजनिक सभेच्या स्थापनेसंदर्भातील इतिहास नेमका काय आहे?

– चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा शके १७९२ या मुहूर्तावर २ एप्रिल १८७० रोजी औंध संस्थानचे पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली. ‘सार्वजनिक काका’ म्हणून ज्यांचा गौरव केला जातो, त्या गणेश वासुदेव जोशी यांनी सभेच्या स्थापनेत प्रमुख भूमिका पार पाडली. स्वातंत्र्यपूर्व काळात सभेने अनेक सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा घडवून आणल्या. ब्रिटिश राजवटीमध्ये विविध प्रश्न सोडविण्याचे काम केले. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्रमासिक सुरू केले. बुधवार पेठेतील ज्या जागी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली त्याच कार्यालयातून सभेचे कार्य सुरू आहे. या वास्तूचे नूतनीकरण होईपर्यंतच्या काळात जंगली महाराज रस्त्यावर सभेचे कार्यालय होते.

*  संस्थेच्या कामकाजामध्ये मान्यवरांचा सहभाग कसा होता?

– महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर असे दिग्गज नेते संस्थेत येत असत. पंतप्रतिनिधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, न्या. महादेव गोविंद रानडे, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, ‘काळ’कर्ते शि. म. परांजपे, साहित्यसम्राट न. चिं. केळकर, नाटय़ाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे यांनी सभेचे अध्यक्षपद भूषविले. अशा दिग्गजांनी नेतृत्व करून आपल्या पाऊलखुणा उमटविल्या आणि स्वाभाविकच संस्थेच्या कार्याचा पाया व्यापक झाला. या सर्वाच्या विचाराप्रमाणे सभा आजही काम करते.

*   सामाजिक उपक्रमात संस्थेचा सहभाग कशा स्वरूपाचा होता?

– त्या काळी पुरुषमंडळी विविध कारणांनी एकत्र येत असत. पण, महिलांना एकत्र येण्यासाठी असे कोणतेही व्यासपीठ नव्हते. ही बाब ध्यानात घेऊन सार्वजनिक काका यांनी सभेच्या सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली. सर्व समाजातील महिलांनी एकत्र यावे म्हणून पुणे सार्वजनिक सभेने सुरू केलेला चैत्रागौरी हळदी-कुंकू हा उपक्रम आजही अव्याहतपणे सुरू आहे. पहिल्या वर्षी या उपक्रमास शंभर रुपये खर्च आला होता आणि हळदी-कुंकू उपक्रमामध्ये एक हजार महिला सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रउभारणीमध्ये महिलांचे योगदान हवे हा सार्वजनिक काका यांचा अट्टाहास होता. समाज साक्षर आणि सुशिक्षित व्हायला पाहिजे, या उद्देशाने सामाजिक कार्याची उंचच उंच गुढी उभारण्यासाठी तेव्हापासून सुरू झालेले प्रयत्न आजही सुरूच आहेत. लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या पैसा फंड तसेच मद्यपान निषेध या चळवळींच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य पुणे सार्वजनिक सभेने केले. टिळक यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षाचे कार्य सभेने केले. महात्मा गांधी यांच्या असहकार आंदोलन आणि कायदेभंग चळवळीचा प्रचार आणि प्रसार पुणे सार्वजनिक सभेने केला.

*  सामाजिक चळवळीचे व्यासपीठ हे स्वरूप कसे प्राप्त झाले?

– स्वातंत्र्य चळवळीचा वारसा असलेल्या काँग्रेसची स्थापना पुण्यात होणार होती. सार्वजनिक सभेकडे सामाजिक आणि राजकीय चळ?वळीचे विद्यापीठ म्हणून पाहिले गेले. सभेमध्ये होणाऱ्या चर्चेतून राष्ट्रीय सभेची कल्पना पुढे आली. सार्वजनिक सभेच्या कार्यालयामध्येच राष्ट्रीय सभेची घोषणा होणार होती; पण मुंबई येथे झालेल्या अधिवेशनात राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. याच राष्ट्रीय सभेला पुढे ‘काँग्रेस’ म्हणून मान्यता मिळाली. पुणे सार्वजनिक सभेचे तत्कालीन अध्यक्ष साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी राष्ट्रीय सभेच्यावतीने ब्रिटनच्या संसदेमध्ये स्वराज्याची मागणी केली होती.

*  समाजाचे प्रश्न ऐरणीवर आणण्यात सभेचे योगदान कशा स्वरूपाचे होते?

– इंग्रजांच्या राजवटीमध्ये भारतीयांचा कैवार घेऊन विविध प्रश्न सोडविण्यासाठी सभेने प्रयत्न केले. जनतेची गाऱ्हाणी मांडणारा पहिला जाहीर अर्ज पुणे सार्वजनिक सभेनेच दिला. लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पहिले इंग्रजी आणि मराठी त्रमासिक सभेने सुरू केले. न्या. महादेव गोविंद रानडे, नामदार गोपाळ कृष्ण गोखले असे दिग्गज लेख लिहून समाजाचे प्रबोधन करीत असत. पहिली स्वदेशी चळवळ सभेनेच सुरू केली. परदेशातील हिंदूी लोकांची गाऱ्हाणी सभेने मांडली. त्यामुळे पुणे सार्वजनिक सभा ही राजकारणाचे आद्यपीठ समजली जात असे.

*  सभेचे सध्या कोणते उपक्रम सुरू आहेत?

– एकविसाव्या शतकातही पुणे सार्वजनिक सभा त्याच ताकदीने काम करीत आहे. समाजामध्ये विधायक कार्य करणाऱ्या व्यक्तीचा गौरव करण्याच्या उद्देशातून सभेने २००१ पासून ‘सार्वजनिक काका पुरस्कार’ देण्यास सुरुवात केली आहे. २००९ पासून ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान केला जात आहे. तर, गेल्या चार वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलेस ‘रमाबाई रानडे पुरस्कार’ देऊन गौरव केला जात आहे. यंदा कामगार नेत्या मुक्ता मनोहर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

मुलाखत- विद्याधर कुलकर्णी