हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मतदारसंघातील विविध विकास कामाचा शुभारंभ राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार रविवारी पुण्यात आले होते. या उद्घाटन समारंभाआधी भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमामध्ये जेटलींच्या फोटोला हार घालून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. मात्र या कार्यक्रमानंतर मागील दोन दिवसापासुन जेटलींचा फोटो रस्त्याच्या कडेला पडून असल्याचे दिसत आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे शनिवारी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना देशभरातील सर्व पक्षीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अनेक राज्यांमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी देशाचे माजी अर्थमंत्री असलेल्या अरुण जेटली यांना  श्रध्दांजली वाहून आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शोकसभांचे आयोजन केले. रविवारी पुण्यातील हडपसरमध्ये आमदार टिळेकर यांच्या आमदारनिधीतून करण्यात आलेल्या विविध विकास कामाच्या शुभारंभ आणि उद्घाटन कार्यक्रमाआधी मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी जेटली यांना श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर मंडळीची दमदार भाषणे झाली. हा कार्यक्रम साधारण दोन तास चालला.

कार्यक्रम संपल्यानंतर तेथील मांडव आणि इतर सर्व साहित्य काढून घेण्यात आले. पण ज्या व्यासपीठावरुन अरुण जेटलींना नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली त्या जेटलींच्या फोटोकडे साधे कोणाचे लक्ष देखील गेले नाही. ज्या नेत्याने भाजपा सत्तेत नसताना विरोधी पक्षाची बाजू खंबीरपणे मांडली आणि सत्तेमध्ये आल्यावरही अर्थमंत्री पदाची जबाबदारी समर्थपणे आपल्या खांद्यावर घेत जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन एक वेगळा ठसा उमटविला त्या नेत्याचा पुष्पहार घातलेला फोटो मागील दोन दिवसापासून रस्त्याच्या कडेला तसाच पडून आहे. याकडे कोणाचे लक्ष नसल्याने सोशल मीडियावर यावर खंत व्यक्त करण्यात येत आहे.