‘‘राजकारणात वाढलेली आक्रमकता आणि गोंधळलेली माध्यमे यामुळे सामाजिक पातळीवर अस्वस्थता पसरलेली आहे. असे असताना नव्या पिढीने राजकारणात प्रवेश करण्याची आणि राजकारणातील आक्रमकतेपासून स्वत:ला दूर ठेवण्याची आवश्यकता आहे,’’ असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी शनिवारी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या सातव्या पदवी प्रदान सोहळ्याच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पटेल बोलत होते. या वेळी पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्ययनाचे प्रमुख डॉ. हरी नरके, नवी दिल्ली येथील इंडियन काऊन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे उपाध्यक्ष डॉ. एस. एन. पठाण, माईर्स एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, संस्थापक अधिष्ठाता राहुल कराड, अधिष्ठाता शरदचंद्र दराडे पाटील, संचालक डॉ. आर. एम. चिटणीस, एमआयटी स्कूल ऑफ बिझनेसचे संचालक डी. पी. आपटे, सहयोगी संचालक जे. के. जोशी उपस्थित होते.
या वेळी पटेल म्हणाले, ‘‘आजचे राजकारण हे आक्रमकता, भ्रष्टाचार यांनी वेढले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी तरूणांनी राजकारणात जरूर प्रवेश करावा. मात्र, या सगळ्यापासून दूर राहावे. देशाच्या जडण-घडणीत वेगवेगळ्या सामाजिक अवस्था येतच असतात. भारतानेही आतापर्यंत अनेक अवस्था पाहिल्या आहेत. मात्र, आजही देशापुढे अनेक समस्या आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी युवकांनी जगाकडे डोळे उघडे ठेवून पाहिले पाहिजे आणि सामाजिक बदलांची जाण राखली पाहिजे. तरूणांनी राजकारणात प्रवेश करताना सामान्यांच्या प्रश्नांचे भान ठेवले पाहिजे.’’