News Flash

विकास आराखडय़ाच्या विरोधात भाजपतर्फे आजपासून अभियान

पुणे शहर विकास आराखडय़ाच्या विरोधात सर्व स्तरावर संघर्ष करण्यासाठी शहर भारतीय जनता पक्षातर्फे अनेक कार्यक्रम सुरू ( रविवार,२ जून पासून) होत आहे.

| June 2, 2013 02:39 am

पुणे शहर विकास आराखडय़ाच्या विरोधात सर्व स्तरावर संघर्ष करण्यासाठी शहर भारतीय जनता पक्षातर्फे अनेक कार्यक्रम सुरू करण्यात येत असून त्यातील हरकती-सूचना नोंदवण्याचा कार्यक्रम रविवार (२ जून) पासून सुरू होत आहे. त्या शिवाय आराखडय़ावर १३ जून रोजी महाचर्चाही आयोजित करण्यात आली आहे.
भाजपचे महापालिकेतील गटनेता अशोक येनपुरे यांनी शनिवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. संपूर्ण शहराला बकाल करणारा आराखडा शहराच्या हिताचा नसल्यामुळे, तसेच या आराखडय़ात फक्त टीडीआर आणि एफएसआयची खैरात करण्यात आल्यामुळे आराखडय़ाच्या विरोधात भाजपतर्फे सर्व स्तरावर संघर्ष केला जाणार आहे. त्याचा प्रारंभ रविवारी होत आहे. आराखडय़ाला नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणावर हरकती-सूचना नोंदवून घेण्याच्या कार्यक्रमाला रविवारी सुरुवात होईल आणि १० जूनपर्यंत हा कार्यक्रम चालेल, असे येनपुरे यांनी सांगितले. शहरातील शंभर प्रमुख चौकांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
विकास आराखडय़ाशी संबंधित सर्व घटकांना एकत्र आणून १३ जून रोजी मयूर कॉलनीमधील बालशिक्षण प्रशालेच्या सभागृहात महाचर्चा आयोजित करण्यात आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता विनोद तावडे आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची या वेळी प्रमुख उपस्थिती असेल. हे अभियान चालवण्यासाठी अशोक येनपुरे, गणेश बीडकर, प्रा. मेधा कुलकर्णी, राजेश पांडे आणि प्रा. श्रीपाद ढेकणे यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 2:39 am

Web Title: bjps campaign from today against dp
Next Stories
1 डेक्कन क्वीनचा ८३ वाढदिवस जल्लोषात
2 ‘गाने गाने पे लिखा, गाने वाले का नाम’
3 गुरू-शिष्य परंपरा लोप पावतेय – पं. बबनराव हळदणकर यांची खंत
Just Now!
X