२५ जून १९२४ ला बगदादमध्ये जन्म.
तुम्ही म्हणाल की मग एवढ्यात तर झाला की जन्मदिन? दिग्गजांचे लेख येऊन गेले त्याच्यावर. मग आज काय परत? तर ते थोडं वारकऱ्यांची सेवा करण्यासारखे आहे. त्यांच्याकडे कसं वारीला जाताना सगळेजण आवर्जून बघतात, येताना बिचाऱ्यांना कोणी विचारत नाही. त्यामुळे त्याच्या पुण्यतिथीचेही थोडं महत्त्व. माझ्याकडून थोडी सेवा समजा हवीतर!
तसा मदनमोहन चुनीलाल कोहली या माणसाचे निधन १४ जुलै १९७५ मध्ये मुंबापुरीत झाले. या ५१ वर्षांच्या आयुष्यात संगीतकार म्हणून त्याने जगलेले आयुष्य जेमतेम २५ वर्षांचे. पण त्यात दिलेल्या गाण्यांनी दिलेला आनंदाची पैशात मोजदाद करता येईल?
काय ती अमर शब्दांची निवड? केवढ्या अवीट गोडीच्या त्या चाली? केवढी अफाट कंपोझिशन्स? काय ते मदनमोहन या शापित गंधर्वाकरता लावलेले सूर? ऐकणाऱ्याचा फक्त जीवच घ्यायला जन्माला आलेले सूर…
भारतीय संगीतात फक्त स्वतःला जे आवडते ते आणि तेवढेच संगीत देणारे संगीतकार जन्माला आले, त्यातले मला आठवणारे पहिले नाव मदनमोहन.
त्यावेळी लतादिदी मदनमोहनसाठी जरा जास्तीच जीव तोडून गायच्या. ‘लग जा गले’, ‘अदालत’मधले ‘यूं हसरतो के दाग’, ‘अनपढ’मधले ‘उनको ये शिकायत है के हम’ ‘आपकी नजरोने समझा’ ही तर मदनमोहनच्या फॅन्सची कायमच फेव्हरेट पण माझ्या स्वतःच्या आवडीच्या गाण्यात वरचा नंबर म्हणजे ‘जेलर’मधल्या ‘हम प्यार मे जलने वालोंको’चा पियानोच्या सुरावटीनंतर तो पन्नासेक व्हायोलिन्सचा घेतलेला ‘टेक’ आणि त्यावर कडी करणारा लताबाईंचा तो ‘कातील’ आवाज. तसंच सहज ‘हटके’ म्हणून ‘दुल्हन एक रात की’मधलं लताबाईंच्या आवाजातलं ‘सपनों मे अगर मेरे’ ऐकून बघा. इंटरल्यूड मधल्या सतारीचे सूर आणि लताचा आवाज विलक्षण साम्य वाटेल. प्रत्येक अंतऱ्याला समेवर येताना घेतलेली वेगळी जागा? त्याचं क्रेडीट निःसंशय तर तिच्या ‘मदनभैय्या’लाच. रफीसाहेबांच्या आवाजाबद्दल काय बोलणार? एक से बढकर एक गायलेत मदनमोहनसाठी. पण त्यांनी मदनमोहनकडे गायलेल्या माझ्या आवडत्या गाण्यात सगळ्यात वरचा नंबर चेतन आनंदच्या ‘हकीकत’मधलं ‘मै ये सोचकर उसके दरसे उठा था’. तलतच्या बाबतीत तेच. ‘जहांआरा’ या एकाच पिक्चरमधेच ‘कुर्बान जांवां’ अशी गाणी म्हणवून घेतल्येत ना की बाकी गाणी क्षणभर बाजूला ठेवावी. ते ‘फिर वोही शाम’ असो किंवा ‘मै तेरी नजर का सुरूर हुं’, ‘तेरी आंख के आसू पी जाऊ’ असो. एवढं करूनही ‘किसीकी याद में दुनिया को है भुलाए हुवे’, ‘बाद मुद्दत के ये घडी आयी’ गायला परत रफीसाहेबांना बोलावलंच. तेच आशाबाईंच्या बाबतीत! लोकांना हे कॉम्बिनेशन आठवलं की पहिले गाण आठवतं म्हणजे ‘झुमका गिरा रे’ आशाबाई सांगतात ‘मी हे गाणं म्हणत आत्तापर्यंत लाखो रुपये कमावले’, पण या आशाबाईंकडून माणसानी कसली मास्टरपिस गाणी म्हणून घेतल्येत. ‘वोह कौन थी’मधल्या लताबाईंना मिळालेल्या गाण्यांपुढे (आणि पडद्यावर साधनामुळे) साईड हिरोईन नंबर २ परवीन चौधरीच्या तोंडी दिलेल्या ‘शोख नजर की बिजलीया’ची आठवण लोकांना मुश्कीलीनीच होते, पण गाण्यातले चढ उतार तर बघा? सूर लय सांभाळत हे म्हणणे अवघड काम आहे. तसंच या घडीला आठवतंय ‘बँक मॅनेजर’मधलं मिनू मुमताजच्या तोंडी असलेलं ‘सबाह से ये केह दो के कलीयां बिछाए’ किंवा ‘आखरी दांव’मधलं रफीसोबतचे ड्यूएट ‘हमसफर साथ अपना छोड चले’सह काय हरकती घ्यायला लावल्या आहेत दोघांना साहेबांनी! सहसा मदनमोहन साहेबांच्या अशा चाली लताबाई पटकावून जायच्या. हे गाणं ऐकलं की आशाबाईंना वाटो न वाटो मला कायम त्याची खंत वाटते. काय अप्रतिम जागा घेतल्या आहेत आशाबाईंनी!
तीच गोष्ट किशोरबद्दल. त्याच्या आवाजात फक्त ‘एक मुठ्ठी आसमां’ एवढं एकच गाणं ऐकल ना की मदनमोहन किशोरच्या आवाजाचा किती गंभीरपणे विचार करायचा ते लक्षात येईल. मन्ना डे ‘भिंडीमटन’ खाऊन ‘कौन आया मेरे मन के द्वारे’ असेच भन्नाट गायले एमएमकडे. तशीही मदनमोहनच्या स्वतःच्या आवाजातही काय ‘अजीब कशिश’ होती हे त्याच्या आवाजात ‘नैना बरसे’, ‘माई री’, ‘दिल ढुंढता है’ ऐकल्यावर जाणवतं.
तसं भूपेंद्रसारख्या एका अप्रतिम गिटार वादकाचा आवाज हेरून त्याला गायला लावायचं श्रेय सर्वप्रथम मदनमोहनकडेच जातं हे आज कितीजणांना माहितीये? तेच कारण असेल कदाचित पण भूपिंदर सिंगचा आवाज खरा ‘लागला’ तो एमएमकडेच. ‘मौसम’मधल्या सोळा चालीतून फायनल झालेल्या ‘दिल ढुंढता है’चे सूर रात्रभर ऐकत मदनमोहनचे गुरु एस.डी. बर्मन बेचैन होऊन स्वतः त्याच्या घरी पहाटे त्याला भेटायला गेल्याची आठवण पं. हरिप्रसाद चौरसियांनी एका मुलाखतीत सांगितली होती. ज्या माणसाकडे आपण असिस्टंट होतो तो माणूस, तोही साक्षात एस. डी. बर्मन आपल्या गाण्याची तारीफ करायला आपल्या घरी आपल्याला भेटायला येतो. ‘बैय्या न धरो’ ‘मदन मेरे भाई, बस ये एक गाना मेरे नाम पे कर दो, और मेरे सारे गाने तुम्हारे नाम पे करता हुं’ हे नौशादसारखा संगीतकार म्हणतो! यापेक्षा जास्ती मोठा पुरस्कार एका मनस्वी कलावंताला कोण देणार? आणि तो मिळाल्यावर त्याच्यापुढे आयुष्यात एकच नॅशनल अॅवॉर्ड मिळाल्याची फिकीर एका फौजीनी खरं का करावी? पण लागायची ती गोष्ट त्याच्या मनाला. हळवा होता ना मनानी! त्यात मनस्वी कलावंतांत सगळेच गुण-अवगुण ठासून भरलेले. अशा माणसांना मग आपल्याला डावलले गेल्याची जाणीव जरा जास्तीच प्रकर्षानी होते.
आता एवढं बोललोच आहे तर अजून एक मनातलं सांगू का? मला खरंतर फार नाही लिहिता येत अशा हळव्या माणसांवर. कसला तो सांगता नाही येणार पण त्रास होतो आत कुठेतरी. केवढा आनंद दिलाय या माणसानी!
७५ साल सुरु झालं, मेलडीचा जमाना जवळपास संपला. त्याच्याकडे काम केलेले वादक एक दोन पिक्चर करून म्युझिक डायरेक्टर म्हणून मिरवायला लागले होते. फौजी असल्याचे अवसान बाळगून अजून २-३ वर्षे जगला असता तर मनमोहन देसाईच्या ‘अमर अकबर अँथनी’सारख्या पिक्चरला ‘म्युझिकसाठी’ फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळाल्याचे त्याला बघायला लागलं असतं. नसतं सहन झालं त्याला. बरं झालं आधीच गेला तो…
– अंबर कर्वे
संग्रहित लेख, दिनांक 14th Jul 2016 रोजी प्रकाशित
BLOG : हळव्या मनाचे मनस्वी कलावंत मदनमोहन
मदनमोहन यांच्या गाण्यांनी दिलेला आनंदाची पैशात मोजदाद करता येईल?
Written by लोकसत्ता टीम
First published on: 14-07-2016 at 10:44 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog by ambar karve on music director madan mohan